मुंबई : कृत्रिम मातृत्वासाठी (सरोगसी) स्त्रीबीज दान करणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी वांद्रे पश्चिम येथील आयव्हीएफ क्लिनिकशी संलग्न असलेल्या तीन डॉक्टरांना उच्च न्यायालयाने नुकतेच दोषमुक्त केले. त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी पुरेसा आधार नाही, असे न्यायालयाने या तिन्ही डॉक्टरांना प्रकरणातून दोषमुक्त करताना नमूद केले. तिसऱ्यांदा स्त्री बीज दान केल्यानंतर या अल्पवयीन मुलीचा १० ऑगस्ट २०१० रोजी मृत्यू झाला होता.
न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांनी डॉ. कीर्तीकुमार त्रिवेदी (७३), डॉ. गौरी सुलताने (३९) आणि डॉ. हेता केनिया (४३) या तिघांची दोषमुक्तीची मागणी मान्य केली. स्त्रीबीज दानासाठी मुलीवर तिसऱ्या वेळी शस्त्रक्रिया करताना झालेला निष्काळजीपणा तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे वैद्याकीय अहवालात म्हटले होते. मात्र, या शस्त्रक्रियेत याचिकाकर्त्यांचा सहभाग नव्हता. त्यामुळे, त्यांना मुलीच्या मृत्यूसाठी जबाबदार धरता येणार नाही, असे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दोषमुक्त करताना प्रामुख्याने नमूद केले.
हेही वाचा >>>प्रकाश प्रदूषणापासून मुंबईतील झाडांची मुक्तता
मृत अल्पवयीन मुलगी एका भंगार गोदामात काम करायची. ती घरी परतली नाही म्हणून तिच्या आईने ती काम करत असलेल्या गोदाम मालकाकडे तिच्याबाबत चौकशी केली. त्यावेळी, त्याने तिला काळजी करू नका आणि मुलगी सुखरूप घरी परतेल, असे आश्वासन दिले. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी ९ ऑगस्ट २०१० रोजी मुलगी घरी परतली. परंतु, ती कुठे होती हे तिला आईला सांगता आले नाही. आदल्या दिवशी ती अन्नातून दिलेल्या पदार्थामुळे बेशुद्ध झाली होती. घरी परतल्यानंतर, काही तासांनंतर तिने पोटदुखीची तक्रार केली. तिला स्थानिक डॉक्टरांकडे नेण्यात आले. वेदना कमी न झाल्याने तिला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे बाह्यरुग्ण विभागात तिच्यावर उपचार करण्यात आल्यावर तिला घरी सोडण्यात आले. परंतु, तिची प्रकृती अधिकच खालावल्याने स्थानिक डॉक्टरांनी तिला पुन्हा राजावाडी रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र, रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला.
हेही वाचा >>>फेरीवाल्यांवर कठोर कारवाईसाठी पालिकेची तयारी; अतिक्रमण निर्मूलन निरीक्षकांची ११८ पदे भरणार
शवविच्छेदन अहवालात या अल्पवयीन मुलीच्या शरीरावर अनेक जखमा आणि इंजेक्शनच्या खुणा असल्याचे आढळून आले. त्यानंतर, साकीनाका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्यावेळी, ही मुलगी प्रजनन क्लिनिकमध्ये स्त्रीबीज दान करत असल्याचे समोर आले. अल्पवयीन मुलांना शुक्राणू किवा स्त्रीबीज दान करण्यास कायद्याने मनाई असतानाही या मुलीने तीन वेळा स्त्रीबीज दान केले होते.
वैद्याकीय हलगर्जी
वैद्याकीय हलगर्जी मुलीच्या मृत्यूस जबाबदार धरून पोलिसांनी प्रजनन चिकित्सालय चालवणाऱ्या आणि प्रक्रिया करणाऱ्या इतर डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला. याचिकाकर्त्यांनी सुरुवातीला सत्र न्यायालयात दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता. मात्र, तो फेटाळला गेला होता.