scorecardresearch

२००८ सालचे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : खटला निकाली निघण्यास आणखी किती काळ लागणार ?

उच्च न्यायालयाची एनआयएला विचारणा

२००८ सालचे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : खटला निकाली निघण्यास आणखी किती काळ लागणार ?
मालेगाव येथे २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटला पूर्ण करण्यासाठी आणखी किती काळ लागेल, अशी विचारणा उच्च न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) केली आहे

मालेगाव येथे २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटला पूर्ण करण्यासाठी आणखी किती काळ लागेल, अशी विचारणा उच्च न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) केली आहे. खटल्याचे कामकाज जलदगतीने करण्याचे आदेश सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने वारंवार दिले आहेत. मात्र खटल्याचे कामकाज गोगलगायीच्या गतीने सुरू असल्याप्रकरणी खटल्यातील आरोपी समीर कुलकर्णी याने याचिका केली आहे.

हेही वाचा >>> मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लाॅक

न्यायमूर्ती अजय गडकरी आणि मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर कुलकर्णी याच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी या गतीने खटला पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आणखी किती वर्षे लागतील, असा प्रश्न न्यायालयाने एनआयएला केला. त्यावेळी खटला जलदगतीने चालवण्याच्या न्यायालयाच्या मागील आदेशांचे पालन करण्यासाठी प्रत्येक सुनावणीच्या वेळी किमान दोन साक्षीदारांना हजर करण्यात येत असल्याचे एनआयएचे वकील संदेश पाटील यांनी न्यायालयाला सांगितले. तथापि, बऱ्याचदा एकाच साक्षीदाराची साक्ष अनेक दिवस नोंदवण्याचे काम सुरू असते. खटल्यातील एका साक्षीदाराची सलग नऊ दिवस तपासणी केली गेली. अनेक दिवस सुरू असलेली उलटतपासणी न्यायालय किंवा आम्ही थांबवू शकत नाही, असेही पाटील यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा >>> आरे कारशेडप्रकरणी २७ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

त्यावर खटला चालवणाऱ्या विशेष न्यायालयाला खटला जलदगतीने निकाली काढण्यासाठी तपास यंत्रणा सहकार्य करू शकते. या प्रकरणी ४९५ साक्षीदारांना आरोपींविरोधात तपासण्यात येणार असल्याचे सुरुवातीला एनआयएने म्हटले होते. जुलै महिन्यात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात, २५६ साक्षीदार तपासले असून आणखी २१८ साक्षीदार तपासायचे असल्याचे तपास यंत्रणेने नमूद केले होते. परंतु गेल्या जुलै महिन्यापासून आतापर्यंत केवळ १५ साक्षीदार तपासण्यात आल्यावर न्यायालयाने बोट ठेवले. त्यावर जुलै महिन्यातील प्रतिज्ञापत्रात आणखी २१८ साक्षीदार तपासण्याचे नमूद करण्यात आले असले तरी एवढे साक्षीदार तपासले जाणार नसल्याचा दावा एनआयएतर्फे करण्यात आला.त्यानंतर आतापर्यंत खटल्यात २७१ साक्षीदार तपासण्यात आले असून त्यापैकी २६ साक्षीदारांनी साक्ष फिरवली आहे. हा एक गंभीर खटला आहे आणि १४ वर्षे उलटली तरी खटला कोणत्याही निष्कर्षाप्रत आलेला नाही. याउलट निम्म्या आरोपींची सुटका झाल्याचे कुलकर्णी याने न्यायालयाला सांगितले. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित खटला, समझौता बॉम्बस्फोट खटला, अजमेर बॉम्बस्फोट खटला कधीच निकाली निघाले. परंतु हा खटला अद्यापही निकाली निघालेला नसल्याचे कुलकर्णी याने न्यायालयाला सांगितले. कुलकर्णी याच्या आरोपांना पाटील यांनी आक्षेप घेतला.

हेही वाचा >>> शतकांचं शतक झळकावणाऱ्या मुंबईच्या क्रिकेटपटूचं सुप्रिया सुळेंनी केलं कौतुक

न्यायालयानेही कुलकर्णी याला युक्तिवाद करताना नियमांचे पालन करण्यास सांगितले. आरोपी अर्ज दाखल करत राहतात आणि खटल्याच्या सुनावणीला विलंब करतात, असेही न्यायालयाने सुनावले. तसेच आरोपींकडून असे किती अर्ज करण्यात आले, अशी विचारणा न्यायालयाने यावेळी केली. त्यावर ७१९० अर्ज केल्याची माहिती पाटील यांनी दिली. तसेच याचिकेवरील सुनावणी स्थगित करताना खटला पूर्ण करण्यासाठी आणखी किती वेळ लागेल, अशी विचारणा न्यायालयाने पुन्हा एकदा एनआयएकडे केली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या