चिकुनगुनियाचे पाच वर्षांतील सर्वाधिक रुग्ण; राज्यातील रुग्णसंख्या दोन हजारांवर

चिकुनगुनिया आणि डेंग्यूचा प्रसार हे एडिस इजिप्ती या एकाच डासापासून होत असल्यामुळे डेंग्यूचा फैलाव वाढला की चिकुनगुनियाचा प्रसारही वाढतो.

 मुंबई:  राज्यात गेल्या चार वर्षाच्या तुलनेत यावर्षी चिकुनगुनियाचा प्रसार वेगाने वाढला असून ऑक्टोबरमध्येच रुग्णसंख्येने दोन हजाराचा आकडा पार केला आहे. पाच वर्षांपूर्वी २०१६ मध्ये राज्यात २ हजार ९४९ रुग्ण आढळले होते.

राज्यात करोनाच्या साथीचा प्रसार गेल्या काही महिन्यांपासून मंदावत असला तरी डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव मात्र वाढला आहे. राज्यात २०१६ साली चिकुनगुनियाचा उद्रेक वाढल्यानंतर २०१७ पासून दरवर्षी प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. मात्र या काळात रुग्णसंख्या दोन हजारांपेक्षा कमी राहिली. गेल्यावर्षी करोनाचा प्रादुर्भाव जास्त चिकुनगुनियाच्या चाचण्या फारशा झाल्या नाहीत. त्यामुळे रुग्णसंख्येत मोठी घसरण झाल्याचे आढळले. २०२० मध्ये चिकुनगुनियाचे ७८२ रुग्ण आढळले होते. यावर्षी मात्र चिकुगुनियाचा प्रसार वेगाने झाला असून जानेवारी ते ऑक्टोबर या काळातच २ हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

‘चिकुनगुनिया आणि डेंग्यूचा प्रसार हे एडिस इजिप्ती या एकाच डासापासून होत असल्यामुळे डेंग्यूचा फैलाव वाढला की चिकुनगुनियाचा प्रसारही वाढतो. राज्यात २०१८ पासून डेंग्यूचा प्रसार वाढत असल्याने चिकुनगुनियाचे प्रमाणही वाढत आहे. राज्यात  डेंग्यूचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या जिल्ह्यांतच सध्या चिकुनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत.

 पुणे, त्यानंतर नाशिक, कोल्हापूर या भागात या आजाराचे प्रमाण वाढत आहे,’ असे राज्याचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप यांनी सांगितले.

मुंबईत ४५ रुग्ण

चिकुनगुनियाचे प्रमाण मुंबईतही गेल्या काही दिवसांपासून वाढत असून सध्या ४५ रुग्ण  आहेत.

 खासगी डॉक्टरांकडून या रुग्णांची नोंद केली जात नसल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अंमलबजावणीमध्ये अडचणी येतात. त्यामुळे या रुग्णांबाबत माहिती देण्याची सूचना पुन्हा एकदा खासगी रुग्णालयांना दिली असल्याचे मुंबई पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

डासांची उत्पत्ती रोखण्याचे आव्हान…

वाढते शहरीकरण आणि बदलते वातावरण यामुळे डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढत असून प्रामुख्याने शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसत आहे. डेंग्यु किंवा चिकुनगुनियाचा प्रसार करणारा डास हा दिवसा चावतो. त्यामुळे केवळ घरातच नाही तर कामाच्या ठिकाणीही याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. या डासांची अंडी पाण्याशिवाय वर्षभर टिकतात. पाणी मिळाल्यानंतर यातून डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे या डासांची उत्पत्ती रोखणे आव्हानात्मक असल्याचे मत डॉ. जगताप यांनी व्यक्त केले.

वेळीच उपचार आवश्यक

चिकुनगुनिया या आजारात मृत्यूचे प्रमाण शून्य असले तरी तापानंतर होणारी सांधेदुखी जास्त त्रासदायक आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास अधिक होतो. काही रुग्णांना तीन महिन्यांहून अधिक काळ सांधेदुखीचा त्रास होतो. त्यामुळे याचे वेळीच निदान करून उपचार सुरू करणे आवश्यक आहे. परंतु अनेकदा चाचण्यांमधूनही याचे निदान होत नसल्यामुळे लक्षणे आणि  रक्ताच्या इतर चाचण्यांवरून आजाराचे निदान केले जाते, असे डॉ. जयेश लेले यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The highest number of chikungunya patients in five years akp

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!