मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही ठिकठिकाणची गोविंदा पथके उंचच उंच मानवी मनोरे रचत आहेत. या उत्साही माहोलमध्ये मालाड पूर्व येथील शिवसागर गोविंदा पथकाने वरळीतील जांबोरी मैदानातील दहीहंडी उत्सवात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या गोविंदा पथकाने तीन थरांचा मानवी मनोरा रचून चौथ्या थरावर ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा केलेला वध’ या शिवकालीन प्रसंगाचे सादरीकरण करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
भाजपतर्फे वरळीतील जांबोरी मैदानात परिवर्तन दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडी महोत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली होती. त्यांच्यासमोर शिवसागर गोविंदा पथकाने तीन थर रचून चौथ्या थरावर ‘अफजलखानाचा वध’ देखावा सादर केला. हा देखावा सादर करत असताना ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या मराठी चित्रपटातील पोवाडा गीतही वाजत होते. शिवसागर गोविंदा पथकाच्या या देखावा सादरीकरणाला उपमुख्यमंत्र्यांसह दहीहंडीप्रेमींनी टाळ्यांचा गजर करत प्रोत्साहन दिले. तसेच ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा गजरही करण्यात आला. हा क्षण कॅमेऱ्यात टिपण्यासाठी दहीहंडीप्रेमींनी गर्दी केली होती.
हेही वाचा >>>मुंबईत गोविंदा पथकांच्या उत्साहाला पावसाचीही सलामी; भर चिखलात मानवी मनोऱ्यांचा थरार
यंदा शिवसागर गोविंदा पथकाने ‘अफजलखानाचा वध’ हा देखावा वरळीतील जांबोरी मैदानात सादर केला. तर सध्याच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे योगदान समजावे, यासाठी विविध शिवकालीन प्रसंगांवर आधारित देखावा आणि महिला सबलीकरणावर आधारित देखावा हा मानवी मनोऱ्यांवर दादरमधील आयडीयलच्या गल्लीत सादर केला. या देखाव्यांची संकल्पना शिवसागर गोविंदा पथकाचे प्रशिक्षक प्रतीक बोभाटे यांची आहे. तर अध्यक्ष किशोर कदम आणि सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. शिवसागर गोविंदा पथकामध्ये एकूण ३५० ते ४०० गोविंदांचा समावेश असून प्रत्यक्ष थरात २०० जण असतात.