scorecardresearch

महेश भट यांच्या हत्येचा कट रचल्याचे प्रकरण : मुख्य आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन

रेडिओवालाला ५० हजार रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर करताना तेवढ्याच किंमतीच्या एक किंवा दोन हमीदार देण्याची अट न्यायालयाने घातली आहे.

महेश भट यांच्या हत्येचा कट रचल्याचे प्रकरण : मुख्य आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक-निर्माते महेश भट यांच्या हत्येचा कथित कट रचल्याचा आरोप असलेला कुख्यात गुंड रवी पुजारीचा साथीदार ओबेद रेडिओवाला याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.

रेडिओवालाला ५० हजार रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर करताना तेवढ्याच किंमतीच्या एक किंवा दोन हमीदार देण्याची अट न्यायालयाने घातली आहे. असे असले तरी रेडिओवालावर चित्रपट निर्माते करीम मोरानी यांच्यावर गोळीबार केल्याचाही आरोप असल्याने त्याला कारागृहातच राहावे लागणार आहे.

सहआरोपीने दिलेला कबुलीजबाब वगळता भट यांच्या हत्येचा कट रचल्याच्या कथित आरोपाच्या प्रकरणात रेडिओवालाचा सहभाग दाखवणारा कोणताही पुरावा नाही, याकडे त्याच्या वकील नाझनीन खत्री यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकलपीठानेही रेडिओवालाला जामीन मंजूर करताना अनेक बाबी लक्षात घेतल्या. त्यात कथित गुन्हा घडत असताना रेडिओवालाने खटल्यातील सहआरोपीला साडेतीन लाख रुपये रक्कम दिली होती. रेडिओवाला आणि सहआरोपी भाऊ असून त्यांच्यातील संबंध संशयाच्या नजरेतून पाहता येणार नाहीत. त्यांच्या आईची काळजी घेण्यासाठी त्यांनी ही रक्कम आगाऊ दिल्याची कागदपत्रे त्यांच्या वकिलांनी सादर केल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले.

केवळ सहा ते सात लाख रुपयांची रक्कम भावाच्या नावे हस्तांतरित केल्याच्या आरोपावरून रेडिओवालाला सकृतदर्शनी दोषी ठरवले जाऊ शकत नाही. तसेच त्याच्यावरील मोक्का हटवण्यात आला असून त्याला खटल्याला सामोरे जावेच लागणार आहे. मात्र त्याच्या कोठडीची गरज नसल्याचे न्यायमूर्ती डांगरे यांनी त्याला जामीन मंजूर करताना नमूद केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या