मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (‘आयडॉल’) पदव्युत्तर द्वितीय वर्ष व्यवस्थापन अभ्यासक्रमाची (एस.वाय.एम.एम.एस) तृतीय सत्र परीक्षा ८ ते १७ जून या कालावधीत होणार होती. परंतु अपुरे अध्ययन साहित्य आणि कामांच्या दिवसांमध्ये परीक्षेचे आयोजन केल्यामुळे, परीक्षा पुढे ढकलून सुट्टीच्या दिवसांमध्ये घेण्याची मागणी विद्यार्थ्यांसह युवा सेनेने केली होती. या पार्श्वभूमीवर सदर परीक्षा ही काही तांत्रिक कारणास्तव पुढे ढकलून २९ जूनपासून सुरू होणार असल्याचे ‘आयडॉल’कडून स्पष्ट करण्यात आले.
‘आयडॉलमध्ये हजारो विद्यार्थी नोकरी सांभाळून शिक्षण घेत असून, व्यवस्थापन अभ्यासक्रमाची सुरुवात अलीकडेच शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये झाली. यामुळे अध्ययन साहित्याअभावी विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे आणि कामांच्या दिवसांमध्ये परीक्षेचे आयोजन केल्यामुळे नोकरीवर परिणाम होण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली होती. यामुळेच त्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. परीक्षेची वेळ आणि परीक्षा केंद्र हे पूर्वीप्रमाणेच राहणार असून २९ जूनपासून सुरू होणाऱ्या परीक्षेचे सुधारित सविस्तर वेळापत्रक हे https://mu.ac.in/distance-open-learning या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.




‘विद्यार्थ्यांना होणारी अडचण आणि त्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान हे विद्यापीठाला निवेदनाद्वारे कळवून परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. यानंतर प्रशासनाने याकडे गांभीर्यांने लक्ष देऊन परीक्षा पुढे ढकलली. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे’, असे युवा सेनेचे सह-सचिव ॲड. संतोष धोत्रे आणि परशुराम तपासे यांनी सांगितले.