पत्नीने तक्रार केल्यानंतर बोरीवली येथील एमएचबी पोलिसांनी एका पोलीस उपनिरीक्षकाविरोधात बुधवारी कौटुंबिक हिंसेचा गुन्हा दाखल केला. आरोपी उपनिरीक्षक पालघर येथील पेल्हार पोलीस ठाणे येथे कार्यरत असून त्याच्यासह एकूण तिघा जणांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
३८ वर्षीय तक्रारदार बोरीवली पश्चिम येथील योगी नगर परिसरातील रहिवासी आहेत. आरोपी पती त्यांचा मानसिक व शारिरीक छळ करीत असून त्यांना शिवीगाळ तसेच मारहाणही करण्यात आली आहे. याशिवाय सासू व नणंद यांनीही छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा त्रास २०१० पासून सुरू असून याप्रकरणी बुधवारी एमएचबी पोलीस ठाण्यात मारहाण करणे, धमकावणे तसेच कौटुंबिक हिंसा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बुधवारीच गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी तपास प्राथमिक स्तरावर असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.