मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या के – पश्चिम विभाग कार्यालयाच्या हद्दीतील वेसावे गावठाण भागात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या एका चार मजली इमारतीवर प्रशासनाने हातोडा चालविला. या इमारतीचे बांधकाम करताना सीआरझेड नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले होते. सुमारे ३ हजार चौरस फूट जागेतील इमारतीचे बांधकाम पालिकेने पाडले.

मुंबईच्या वेसावे परिसरात सागरी किनाऱ्यालगतच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागात अनधिकृतपणे बांधकामे करण्यात आली आहेत. या बांधकामांमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून परिसंस्थेला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे सीआरझेड क्षेत्रात म्हणजेच समुद्र किनाऱ्यालगतच्या भागात मानवी विकास व बांधकामांवर काही निर्बंध घातले जातात. मात्र, या नियमांचे उल्लंघन करून वेसावे परिसरात अनधिकृतरीत्या इमारती बांधण्यात आल्या होत्या. मागील आठवड्यात वेसावे भागातील सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रातील (कोस्टल रेग्यूलेशन झोन) पाच अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली होती.

महानगरपालिका उपायुक्त डॉ. भाग्यश्री कापसे आणि के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वात के – पश्चिम विभागातील विविध क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांविरोधात मोहीम हाती घेण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर, वेसावे गावठाण परिसरातील अनधिकृत बांधकामांवर मंगळवारी पालिकेने कारवाईचा बडगा उगारला. रामसे मार्गावरील ‘राजे हाऊस’ ही चार मजल्यांची इमारत अनधिकृतपणे बांधण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. ३ हजार चौरस फूट इतके या इमारतीचे क्षेत्रफळ होते. एकूण ८ हँड ब्रेकर, १ गॅस कटर तसेच १ जनरेटरच्या सहाय्याने संबंधित इमारत निष्कासित करण्यात आली. यापूर्वीही वेसावे परिसरातील अनेक अनधिकृत बांधकामे महानगरपालिकेने हटविली आहेत.या कारवाईदरम्यान महानगरपालिकेच्या १४ अधिकारी-कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीआरझेड परिसरातील बांधकामाचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम

  • किनाऱ्याची जैवविविधता नष्ट होते.
  • खारफुटी झाडांना धोका निर्माण होते. मासळी प्रजाती नामशेष होण्याची शक्यता
  • पुराचा धोका वाढतो.
  • भूक्षय होते.