तिकीट दरात कपात करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय
देश-विदेशातील पर्यटकांना मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील (सीएसएमटी) पुरातन वारसा वस्तू संग्रहालयाचे अवघ्या ५० रुपयांमध्ये दर्शन घडणार आहे. मध्य रेल्वेने या संग्रहालयाच्या तिकीट दरात मोठी कपात केली आहे. यापूर्वी २०० रुपये तिकीट दर होते. आता ३० जानेवारीपासून तिकीट दर ५० रुपये करण्यात आले आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा >>>पुणे: मी तपास यंत्रणांचा बळी; हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाई याची न्यायालयीन निर्णयावर प्रतिक्रिया
सीएसएमटीमध्ये पुरातन वारसा वस्तू संग्रहालय असून रेल्वेतील विविध वस्तूंचा ठेवा या संग्रहालयात ठेवण्यात आला आहे. तसेच बोरिबंदर – ठाणे दरम्यान धावलेली पहिली रेल्वे आणि रेल्वेशी संबंधित अन्य महत्त्वपूर्ण माहितीचा खजिना या संग्रहालयात आहे. मोठ्या उत्सूकतेने पर्यटक या संग्रहालयाला भेट देतात. करोनाकाळात मार्च २०२० मध्ये हे संग्रहालय बंद करण्यात आले होते. त्यानंतर १७ ऑक्टोबर २०२२ रोजी हे संग्रहालय पुन्हा पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. दररोज किमान १२ पर्यटक या संग्रहालयाला भेट देतात. या संग्रहालयात येणाऱ्या प्रोढांसाठी २०० रुपये आणि विद्यार्थ्यांसाठी १०० रुपये तिकीट दर आकारण्यात येतात. तिकिटांचे दर जास्त असल्याने ते कमी करण्याची मागणी पर्यटकांकडून करण्यात येत होती. अखेर तिकीट दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नवे तिकीट दर ३० जानेवारीपासून लागू करण्यात येणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. प्रौढासाठी ५० रुपये आणि विद्यार्थ्यांसाठी २० रुपये तिकीट दर आकारण्यात येणार आहेत.