मुंबई : फ्रान्समध्ये भारतातील १० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही आनंदाची बाब आहे. भविष्यात या विद्यार्थ्यांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ व्हावी आणि भारत – फ्रान्समधील संबंध आणखी दृढ व्हावेत, असे मत व्यक्त करीत फ्रान्सचे माजी पंतप्रधान आणि ले हाव्रेचे सध्याचे महापौर एडोआर्ड फिलिफ यांनी भारतीय विद्यार्थ्यांना साद घातली.
एडोआर्ड फिलिप सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. दक्षिण मुंबईमधील सेंट झेवियर्स महाविद्यालयात शुक्रवारी ‘असंतुलित जगामध्ये संतुलनाचा शोध’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. सेंट झेवियर्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लेनन, मुंबईमधील फ्रान्सचे वाणिज्य दूत जीन मार्क सेरे चारलेट यावेळी उपस्थित होते. भारताची यशाची वाटचाल कायम अशीच राहो, अशी सदिच्छा जीन मार्क सेरे चारलेट यांनी व्यक्त केली.
सहकार्य वृध्दिंगत करण्याचा प्रयत्न
भारत – फ्रान्सदरम्यान आर्थिक संबंध आणि परस्परसंबंधातील सहकार्य वृध्दिंगत करण्यासाठी एडोआर्ड फिलिफ भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी दिल्ली आणि मुंबईला भेट दिली. मुंबई भेटीदरम्यान त्यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची भेट घेऊन ले हाव्रे आणि मुंबई या शहरांबाबत चर्चा केली. तसेच न्हावा शेवा बंदरलाही त्यांनी भेट दिली.