scorecardresearch

मुंबई: अवकाळी पावसाचे विधिमंडळात पडसाद; तातडीने मदतीसाठी विरोधक आक्रमक

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना त्वरित मदत जाहीर करण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी बुधवारी आक्रमक भूमिका घेत सभागृहाचे कामकाज रोखले.

ajit pawar
अवकाळी पावसाचे विधिमंडळात पडसाद; तातडीने मदतीसाठी विरोधक आक्रमक

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना त्वरित मदत जाहीर करण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी बुधवारी आक्रमक भूमिका घेत सभागृहाचे कामकाज रोखले. तर सरकार शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजा हवादील झाला आहे. विधानसभेत कामकाज सुरू होताच विरोधकांनी अवकाळी पावसाचा मुद्दा उपस्थित करीत सभागृहात चर्चेची मागणी केली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांना त्वरीत मदत जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थगत प्रस्तावाच्या माध्यमातून केली. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे, त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी पवार यांनी केली. अवकाळी पाऊस, गारपीटीने शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्री धुळवड खेळण्यात दंग होते असा थेट आरोपही त्यांनी केला. नाफेडकडून अजूनही शेतमाल खरेदी सुरु नाही, सरकारकडून सभागृहाची दिशाभूल करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकारच्या संवेदना बोथट झाल्याची टीका त्यांनी केला. नाना पटोले, छगन भुजबळ, जयंत पाटील यांनीही आक्रमक भूमिका घेत सभागृहात चर्चेची मागणी केली. मात्र विरोधकांची ही मागणी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावली. त्यामुळे नाराज झालेल्या विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी करीत कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला.

विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असून लवकरच मदत दिली जाईल अशी ग्वाही दिली. विरोधकांना या विषयाचे राजकारण करायचे आहे. कांदा उत्पादकांना मदत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सभागृहात सांगितले आहे. त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांचे त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. पंचनामे पूर्ण केल्याशिवाय मदत करता येत नाही, असे विरोधकांना माहित आहे. तरीही ते राजकारण करीत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. यावेळी विरोधकांनी नाराजी व्यक्त करीत सभात्याग केला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-03-2023 at 04:44 IST
ताज्या बातम्या