मुंबई : मुंबई महापालिकेत गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेली पक्ष कार्यालये आता लवकरच खुली होणार आहेत. मात्र शिवसेनेचे दोन गट झाल्यामुळे व एमआयएमचे आठ नगरसेवक निवडून आल्यामुळे मुंबई महापालिकेतील राजकीय पक्षांची संख्या वाढली आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्यामुळे आता शिवसेनेचे जुने मोठे पक्ष कार्यालय दोन गटांना विभागून दिले जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात हे दोन्ही गट एकमेकांचे शेजारी असतील.
निवडून आलेल्या नगरसेवकांना कागदपत्रे वाचण्यासाठी, पत्रव्यवहार करण्यासाठी, सभेपूर्वी नगरसेवकांची बैठक घेण्यासाठी पक्ष कार्यालयांची आवश्यकता असते. एखाद्या राजकीय पक्षाच्या नगरसेवकांच्या संख्येनुसार त्यांना लहान मोठे दालन मुंबई महापालिका प्रशासन देत असते. गेली पंचवीस तीस वर्षे मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता असल्यामुळे त्यांचे सर्वाधिक नगरसेवक होते. त्यामुळे त्यांना आकाराने मोठे पक्ष कार्यालय दिले जात असे. मात्र आता शिवसेनेचे दोन गट पडल्यामुळे हेच जुने मोठे कार्यालय दोन गटांना विभागून दिले जाणार आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेच्या शाखा, शिवसेनेचे मतदारसंघ, कार्यकर्ते या सगळ्यातच फूट पडली. तीच फूट आता पक्ष कार्यालयातही पडणार आहे. मुख्य इमारतीत तळमजल्यावर असलेल्या या कार्यालयाचे दोन भाग केले जाणार आहेत.
मुंबई महापालिकेची मुदत मार्च २०२२ मध्ये संपल्यानंतरही माजी नगरसेवकांच्या मागणीनुसार काही काळ पालिकेतील पक्ष कार्यालये सुरू ठेवण्यात आली होती. मात्र जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये शिवसेनेच्या दोन गटात पक्ष कार्यालयातच मोठा वाद झाला. दोन्ही कडचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यामुळे अखेर पालिका प्रशासनाने डिसेंबर २०२२ मध्ये पालिकेतील सगळ्या पक्ष कार्यालयांना टाळे ठोकले होते.
आता निवडणूकीनंतर सर्व राजकीय पक्षांना कार्यालये दिली जाणार आहेत. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (श. प) चे संख्याबळ कमी असल्यामुळे त्यांना कार्यालय मिळणार नाही. तर मनसे आणि एमआयएमला तळमजल्यावरच बाजूबाजूलाच कार्यालय देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कार्यालयांची आणि कार्यालयाबाहेरील रंगरंगोटीची कामे हाती घेण्यात आली आहेत.
पक्ष कार्यालय पाहणी शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल शेवाळे हे मंगळवारी मुंबई महापालिका मुख्यालयात दाखल झाले होते. त्यावेळी महापौर कार्यालयसह विविध महत्वाच्या कार्यालयाची पाहणी त्यांनी केली. भाजपचे महापालिका गट नेते गणेश खणकर यांनीही सभागृहाची व सभागृह नेत्याच्या दालनाची पाहणी केली. विरोधी पक्षनेता कार्यालयाचीही डागडुजी सुरु आहे.

