मुंबई: कुर्ला स्थानकात सोमवारी संध्याकाळी गर्दीच्या वेळी लोकलमध्ये चढण्याच्या तयारीत असलेल्या प्रवाशाचे पैशांचे पाकीट चोरून पळून जाण्याच्या प्रयत्नात आसलेल्या चोराला प्रवाशांनी पाठलाग करून पकडले. याप्रकरणी कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

कर्जत येथे राहणारे रशीद खान (३५) सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास लोकलने कर्जतला जाण्यासाठी कुर्ला रेल्वे स्थानकात आले. कर्जत लोकल येताच ते मित्रासह लोकलमध्ये चढले. याच वेळी चोराने त्यांचे पाकीट पळवले. ही बाब रशीद यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ आरडाओरडा केला. त्यामुळे चोराने तेथून पळ काढला. मात्र रशीद आणि त्यांच्या मित्राने लोकलमधून उडी मारून चोराचा पाठलाग केला. काही अंतरावर त्यांनी चोराला पकडले.काही वेळातच कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीची झडती घेतली असता त्याच्याजवळ रशीद यांचे पाकीट सापडले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The passengers chased the wallet thief and caught him mumbai print news amy