मुंबईः पवई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी) घुसखोरी करणारा बिलाल तेली (२२) या तरूणाचा तेथे घातपाताचा कोणताही उद्देश नव्हता, असे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी २० दिवस तेथे बेकायदेशिररित्या वास्तव्याला होता. आरोपीला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व्हायचे होते, त्यासाठी त्याने अनेक ब्लॉग बनवले होते. तो २१ ई-मेल आयडीद्वारे या ब्लॉगचा प्रसार करणार होता, असे त्याने चौकशीत सांगितले.

ऑनलाईन अभ्यासक्रम नोंदणीच्या नावाखाली तो २७ मे रोजी आयआयटी पवईमध्ये शिरला होता. त्यानंतर तो ७ जूनपर्यंत याच परिसरात राहिला. तेथून तो सूरतला गेला. तेथे नातेवाईकांना भेटल्यानंतर तो पुन्हा १० जून रोजी आयआयटीमध्ये परत आला. त्यानंतर तो पाच दिवस तेथे राहिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. हा कोणताही घातपाताचा प्रकार नव्हता. तेलीने वेब डिझायनिंगमध्ये शिक्षण घेतले आहे. तो यापूर्वी सव्वा लाख रुपये पगारावर नोकरीला होता. तसेच तो दुबईलाही जाऊन आला आहे. आरोपी मूळचा मंगळुरू येथील रहिवासी आहे. पूर्वी तो सूरतला राहत होता. पण त्याचे कुंटुंब नुकतेच तेथे स्थलांतरित झाले. त्याचे वडील मंगळुरूमध्ये व्यवसाय करीत होते. पण करोना काळात त्यांचे मोठे नुकसान झाले.

आयआयटीमध्ये ये-जा करण्यासाठी त्याने २१ ई-मेल आयडीद्वारे नोंदणी केली केली. त्यावर त्याच्याविरोधात संशय बळावला होता. यावेळी त्याने तेथील विद्यार्थ्यांशीही संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मागील आठवड्यात १७ जून रोजी तो संस्थेच्या परिसरात आढळल्यानंतर त्याला पवई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. मात्र त्यावेळी त्याच्याविरोधात किरकोळ गुन्हा दाखल करून त्याला नोटीस देऊन सोडून आले होते. परंतु, हे प्रकरण गंभीर असल्याने त्याच्यावरील गुन्ह्यांच्या कलमांत वाढ करण्यात आली आहे. गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक (सीआययू) आणि राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) या प्रकरणाचा समांतर तपास करीत आहेत.

बिलाल अहमद फैय्याद अहमद तेली (२२) १७ जून रोजी बेकायदेशीरपणे संस्थेच्या व्याख्यानाला बसला होता. त्याला सुरक्षा रक्षकांनी पवई पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्याने २ ते ७ जून आणि १० ते १७ जून या कालावधीतही आयआयटीच्या परिसरातील वसतिगृहात बेकायदेशीरपणे वास्तव्य केले होते. तो ४ जून रोजी पहिल्यांदा आयआयटीच्या विभागप्रमुख शिल्पा कोटीवाल यांना दिसला होता. त्याला हटकल्यावर तो पळून गेला होता. पवई पोलिसांनी १७ जून रोजी त्याच्याविरोधात बेकायदेशीरपणे संस्थेच्या वास्तूत प्रवेश केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२९ (३) आणि ३२९ (४) अन्वये गुन्हा दाखल केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या गुन्ह्यात केवळ सात वर्षांहून कमी शिक्षा असल्याने त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले होते. हा प्रकार गंभीर असल्याने प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. पोलिसांनी बिलाल शेखविरोधातील कलमांत वाढ केली आहे. गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने (सीआययू) त्याला अटक केली आहे. दहशतवाद विरोधी पथकही (एटीएस ) या प्रकरणाचा समांतर तपास करीत आहे.