मुंबई : मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून झवेरी बाजार व अहमदनगर येथे बॉम्ब ठेवल्याची धमकी दिल्याप्रकरणी लोकमान्य टिळक (एल.टी.) मार्ग पोलिसांनी २४ वर्षीय आरोपीला अटक केली. त्याच्याकडून मोबाइल संच जप्त करण्यात आला असून त्याच मोबाइलच्या साहाय्याने आरोपीने धमकी दिल्याचा पोलिसांना संशय आहे.

दिनेश सुतार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो सांगली येथील सांगोला तालुक्यातील रहिवासी आहे. आरोपीने रविवारी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षातील ११२ क्रमांकावर दूरध्वनी केला होता. त्यात अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील नानज व मुंबईतील झवेरी बाजार येथील खाऊ गल्लीमध्ये दोन ठिकाणी बॉम्ब ठेवले आहेत असे सांगितले. त्यावेळी आरोपीने मोठा घातपात व मोठी जीवितहानी करण्याची धमकी दिली. या संपूर्ण प्रकरणानंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली.

हेही वाचा : फाल्गुनी पाठकच्या कार्यक्रमाविरोधात उच्च न्यायालयात याचिका

दहशतवाद विरोधी पथक, गुन्हे शाखा अशा यंत्रणांनाही माहिती देण्यात आली. त्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने केलेल्या तपासानंतर आरोपी वापरत असलेल्या मोबाइल क्रमांकावरून दूरध्वनी आल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यात भादंवि कलम ५०६(२), ५०५(१)(ब), ५०४, १८२ व ५०७ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला याप्रकरणी अटक केली आहे.