मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्यांसह आता लहान मुलेही सर्दी, तापाने बेजार झाली आहे. बालकांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला असून आता अन्य विषाणूजन्य तापाची साथ सुरू झाली आहे.

मागील आठवड्यापर्यंत बालकांना करोनाची बाधा होण्याचे प्रमाण नोंद घेण्याइतपत होते. परंतु आता हे प्रमाण कमी झाले आहे. पावसामध्ये आढळणारे अन्य विषाणूजन्य आजारांचे प्रमाण जवळपास ४० टक्के वाढले आहे. यामध्ये १५ ते २० टक्के बालकांना इनफ्लुएन्झाची बाधा होत आहे. बालकांमध्ये प्रामुख्याने ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी ही लक्षणे दिसून येत आहेत. अन्य १५ ते २० टक्के बालकांमध्ये अन्य विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळत आहे, असे करोना कृती दलातील बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय येवले यांनी सांगितले.

प्रौढांप्रमाणेच बालकांमध्येही करोनाची बाधा होत असल्याचे निदर्शनास आले होते. परंतु सर्व बालकांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. बहुतांश बालकांमध्ये प्रामुख्याने घसादुखी, घसा लाल होणे, ताप येणे, डोकेदुखी ही लक्षणे दिसून येत आहेत. शहरात सलग सुरू झालेल्या पावसामुळे आता अन्य विषाणूजन्य आजारांचे प्रमाणही वाढले आहे. अन्य विषाणूजन्य आजार आणि करोनाची लक्षणे समान आहेत. त्यामुळे मूल आजारी पडल्यावर नेमके कशामुळे ताप येत आहे, हे समजत नसल्याने पालक संभ्रमात आहेत. अनेक वेळा मूल पावसात भिजते, थंड पदार्थ खाते त्यामुळे त्याला करोनाची बाधा झाली आहे की की अन्य विषाणूजन्य आजार हे कळत नाही. परिणामी पालकही चिंतीत होऊ लागले आहेत. परंतु दोन्ही प्रकारच्या आजारांमध्ये बालके दोन – तीन दिवसांत पूर्णपणे बरे होत आहेत. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही, असे बालकाच्या करोना कृती दलाचे प्रमुख डॉ. सुरेश प्रभू यांनी सांगितले.

बालकांमध्ये पोटाच्या तक्रारी

अन्य विषाणूजन्य आजारांसह बालकांमध्ये पोट दुखीच्या तक्रारीही आढळून येत आहेत. त्यामुळे या काळात बालकांनी घराबाहेरील पदार्थ खाणे टाळावे. तसेच पाणी उकळून, गाळून प्यावे. करोना आणि अन्य विषाणूजन्य आजारांसाठी प्रतिबंधात्मक उपाय सारखेच आहेत. हात वारंवार स्वच्छ करावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, मुखपट्टीचा वापर करावा. यामुळे या दोन्ही आजारांपासून संरक्षण होऊ शकते, असा सल्ला डॉ. प्रभू यांनी दिला.

डेंग्यूचाही प्रादुर्भाव

बालकांमध्ये अन्य विषाणूजन्य आजारासोबतच काही जणांमध्ये डेंग्यू आढळत आहे. त्यामुळे झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे आवश्यक असल्याचे डॉ. येवले यांनी सांगितले.