लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनाम – लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी २० ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेतील विविध अटींमध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण या अटीचा समावेश होता. मात्र, विविध स्तरांवरून ही अट रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ती अट रद्द करण्याचे लेखी आदेश महापालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार, महानगरपालिका प्रशासनाने प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसांत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

शैक्षणिक अर्हतेमध्ये आवश्यक सुधारणा करण्याची प्रशासकीय कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू करण्यात आली आहे. सुधारित शैक्षणिक अर्हता निश्चित करून, कार्यकारी सहायक पद भरतीची जाहिरात नव्याने आणि लवकरात लवकर प्रसिद्ध केली जाईल. दरम्यान, सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करणे आवश्यक नसून त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार आहेत. महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा >>>ऑक्टोबरमध्ये एसटीच्या साध्या डिझेल बस दाखल होणार

महानगरपालिकेत कार्यकारी सहायक संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या जागांसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून २० ऑगस्ट २०२४ पासून ऑनलाईन अर्ज मागविले होते. तसेच, अर्ज करण्याची ९ सप्टेंबर ही अंतिम तारीख असल्याचे जाहीर करण्यात आले होते. दरम्यान, या पदासाठी निश्चित केलेल्या शैक्षणिक अर्हतेमध्ये उमेदवार ‘मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा किंवा पदवीधर परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा, अशी अट ठेवण्यात आली होती. मात्र, ही अट काढून टाकण्यात यावी, अशी सूचना व मागणी विविध स्तरांवरून मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार ती अट काढून टाकावी, तसेच शैक्षणिक अर्हतेमध्ये सुधारणा करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर हाती घ्यावी, सुधारित अर्हतेसह पद भरतीची प्रक्रिया नव्याने राबवावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत.

हेही वाचा >>>मेट्रो ३ वापरण्यासाठी ६० टक्के मुंबईकर उत्सुक; अर्थ ग्लोबलचा अहवाल

त्यानुसार, महानगरपालिका प्रशासनाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. शैक्षणिक अर्हतेची अट सुधारित करून त्यास मान्यता प्राप्त करणे, सुधारित अर्हता समाविष्ट करून त्यानुसार पद भरतीची जाहिरात नव्याने प्रसिद्ध करणे, तसेच सुधारित अर्हतेनुसार पद भरतीच्या ऑनलाईन प्रक्रियेत योग्य तांत्रिक बदल करणे, ही सर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कार्यवाही येत्या १५ दिवसांत पूर्ण करून पद भरतीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.