मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांप्रमाणेच यांची काळजी घेणे गरजेचे

मुंबई : मधुमेह, उच्च रक्तदाब याप्रमाणेच हायपोथायरॉइडच्या रुग्णांनाही करोनाचा धोका अधिक असल्याचे मरोळ येथीलसेव्हनहिल्स रुग्णालयाने केलेल्या संशोधनात्मक अभ्यासातून समोर आले आहे. हायपोथायरॉइडच्या रुग्णांनाही जोखमीच्या गटांत सहभागी करून यांना करोनाची बाधा झाल्यास विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे या अभ्यासात अधोरेखित केले  आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब हे दीर्घकालीन आजार असलेल्यांना करोनाची बाधा झाल्यास लक्षणे तीव्र होण्याचा धोका अधिक असून मृतांमध्येही यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळले आहे. हायपोथायरॉइडची बाधा असलेल्या रुग्णांनाही करोनाचा धोका असल्याचे आढळल्यामुळे रुग्णालयाने हा संशोधनात्मक अभ्यास हाती घेतला. ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसिन अ‍ॅण्ड पब्लिक हेल्थ’ या नियतकालिकामध्ये हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे.

सेव्हनहिल्समध्ये मार्च ते डिसेंबर २०२० या काळात १६ हजार ३०६ रुग्ण दाखल झाले. यात करोनाची बाधा होण्यापूर्वीपासून हायपोथायरॉइड असलेल्या २५१ रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. रुग्णांमध्ये ५० वर्षावरील सर्वाधिक १६६ रुग्ण तर ५० वर्षाखालील ८५ रुग्ण होते. हायपोथायरॉइड असलेल्यांमध्ये सुमारे ७३ टक्के महिला तर सुमारे २६ टक्के पुरुष होते. पुरुषांच्या तुलनेत

महिलांमध्ये प्रमाण अधिक आढळले आहे.

हायपोथायरॉइडचे रुग्ण हे जोखमीच्या गटात असून असे रुग्ण करोनाबाधित झाल्यानंतर यांना अद्ययावत उपचारांची आवश्यकता असते. त्यामुळे यांच्याकडे

प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी शिफारस या अभ्यासात केली आहे.

मृतांमध्ये ५० वर्षावरील व्यक्तींचे प्रमाण अधिक

हायपोथायरॉइडच्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण हे तरुणांमध्ये म्हणजेच ५० वर्षाखालील रुग्णांमध्ये सुमारे सहा टक्के आढळले आहे, तर ५० वर्षावरील रुग्णांमध्ये सर्वाधिक सुमारे २५ टक्के आहे. महिलांमध्ये हायपोथॉयराईडचे प्रमाण जास्त असले तरी करोनाची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र जास्त असल्याचे आढळले आहे.

अन्य दीर्घकालीन आजारांची बाधा

या रुग्णांमध्ये केवळ हायपोथायरॉइड असलेले ४२ टक्के रुग्ण होते, तर मृत्यूचे प्रमाण सुमारे सहा टक्के आहे. याव्यतिरिक्त हायपोथायरॉइडसह मधुमेह असलेल्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण २४ टक्के, तर हायपोथायरॉइड आणि उच्च रक्तदाब असलेल्यांमध्ये सुमारे २६ टक्के आहे. हे तिन्ही आजार असलेल्यांपैकी सुमारे ३१ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब हायपोथायरॉइड अशा तिन्ही आजारांची बाधा असलेल्या रुग्णांना करोनाचा धोका अधिक असल्याचे अभ्यासात मांडले आहे.

अतिदक्षता विभागाची गरज २७ टक्के रुग्णांना

हायपोथायरॉइड असलेल्या २७ टक्के रुग्णांना अतिदक्षता विभागाची आवश्यकता भासली. इतर रुग्णांमध्ये हे प्रमाण १३ टक्के आहे. मृतांमध्येही हायपोथॉयराईडची बाधा असलेल्यांचे प्रमाण १८ टक्के आढळले असून इतर रुग्णांमध्ये हे प्रमाण ८ टक्के आहे.