मागील दोन महिन्यांत मुंबईतील घरविक्री दहा हजाराच्या आत स्थिरावली होती. पण अखेर जुलैमध्ये घरविक्रीत वाढ झाली असून या महिन्यात ११३४० घरांची विक्री झाली आहे. यातून सरकारला ८२८ कोटी रुपयांचा महसूल मिळाली आहे. २०२२ मध्ये जानेवारी ते एप्रिलदरम्यान १० हजाराहून अधिक घरे विकली गेली होती. आता त्यानंतर जुलैमध्ये घरविक्रीने १० हजारापेक्षा अधिक झाली आहे.

करोनाची साथ ओसरू लागताच हक्काची आणि मोठी घरे घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. त्यामुळे घरांची विक्री वाढली आहे. मात्र यात चढ उतार दिसत आहेत. त्यामुळेच २०२२ जानेवारी ते एप्रिलमध्ये दहा हजाराहून अधिक घरे विकली गेली. मार्चमध्ये तर सर्वाधिक १६ हजार ७२६ घरे विकली गेली होती आणि यातून ११६० कोटींचा महसूल मिळाला होता. एप्रिलमध्ये मात्र हा आकडा ११७४४ वर आला. यानंतर घरविक्रीत काहीशी घट झाली. मे मध्ये मुंबईत ९८३९ घरे विकली गेली होती आणि यातून ७२६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. जूनमध्ये ९७९० घरांची विक्री झाली आणि यातून ७२३ कोटी रुपये इतका महसूल मिळाला होता. जुलैमध्ये आता पुन्हा घरविक्रीत वाढ दिसून येत आहे. जुलैमध्ये ११३४० घरे विकली गेली असून यातून ८२८ कोटी रुपये इतकी रक्कम मुद्रांक शुल्काच्या रूपाने मिळाली आहे.

यामुळे वाढ?

वाढती महागाई, वाढते गृहकर्ज व्याजदर यामुळे घरविक्रीत घट होईल अशी भीती व्यक्त होत होती. प्रत्यक्षात मात्र घरविक्रीत घट होण्याऐवजी वाढ होत आहे. महागाई आणि व्याजदर आणखी वाढण्याची भीती लक्षात घेता इच्छुक, गरजू ग्राहक घर खरेदीकडे वळत असल्याची माहिती क्रेडाय-एमसीएचआयचे खजिनदार प्रतिम चिवुकुला यांनी दिली.