मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाच्या शिवसेनेतील बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुरू झालेल्या कुरघोडीच्या राजकारणातील पुढचा डाव म्हणून दादरमध्ये शिवसेना भवनच्या परिसरातच शिंदे गटाचे मुख्य कार्यालय उभारण्यात येणार आहे. पुढच्या महिनाभराच्या आत हे कार्यालय सुरू होईल, असे शिंदे गटाचे दादर-माहीम भागातील आमदार सदा सरवणकर यांनी सांगितले.

राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यांत व मुंबईतील सर्व प्रभात शिंदे गटातर्फे कार्यालय उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. शिवसेना व शिवसेना भवन हे एक भावनिक नाते आहे. आता शिवसेनेवरील वर्चस्वासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिंदे गटाशी लढाई लढावी लागत असली तरी शिवसेना भवन ही वास्तू ठाकरे यांच्याकडेच आहे. त्यामुळे लोकमानसात दादर व शिवसेना या समीकरणाला छेद देण्यासाठी आपले मुख्य कार्यालय शिवसेना भवन परिसरातच उभारण्याचा निर्णय शिंदे गटाने घेतला आहे. लोकांना भेटण्यासाठी, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी मुंबईत एक मध्यवर्ती कार्यालय असावे असा विचार पुढे आला. दादर परिसरातील इमारतीमध्ये एका जागेत पुढील १५-२० दिवसांत हे कार्यालय सुरू होऊ शकते, असे सरवणकर यांनी माध्यमांना सांगितले. तसेच काहीजण याला प्रति शिवसेना भवन म्हणत असले तरी तसे काही नाही. ते आमचे मुख्य कार्यालय असेल, असेही सरवणकर यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील प्रत्येक प्रभागामध्ये असेच एक कार्यालय उभारण्यात येईल. मुंबई शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यालयांसाठी जागा निश्चित झाल्या असून त्या- त्या प्रभागातील शाखाप्रमुख नागरिकांच्या समस्या सोडवतील. आम्ही शिवसेनेतच आहोत. आमचे नेतेही या कार्यालयांतून नागरिकांच्या समस्या समजून घेतील आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतील, अशी माहिती सरवणकर यांनी दिली.