शिवसेना नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी शिंदे गटाला मिळाल्यानंतर मंत्रालयातील शिवसेनेचे पक्ष कार्यालय शिंदे समर्थक आमदारांनी ताब्यात घेतले. शिंदे समर्थकांकडून मुंबई महानगरपालिकेतील पक्ष कार्यालय ताब्यात घेण्याची कुणकुण लागल्यामुळे उद्धव ठाकरे समर्थक माजी नगरसेवकांनी सोमवारी महानगरपालिका मुख्यालयात धाव घेतली. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महानगरपालिका मुख्यालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परिणामी महानगरपालिकेला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते.
हेही वाचा >>>शिंदे गट व्हीप बजावण्याच्या तयारीत, ठाकरे गटातील आमदार अपात्र होणार? उद्धव ठाकरे म्हणाले…
निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निशाणी शिंदे गटाला देण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रात घडामोडी घडू लागल्या आहेत. त्याचे पडसाद सोमवारी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात उमटले. मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील टाळेबंद केलेले पक्ष कार्यालय उघडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक ताब्यात घेतील अशी जोरदार चर्चा सुरू होती. त्यामुळे माजी सभागृह नेत्या आणि उद्धव ठाकरे समर्थक विशाखा राऊत आणि अन्य माजी नगरसेवकांनी महानगरपालिका मुख्यालयात धाव घेतली. मुख्यालयातील बंद पक्ष कार्यालयाबाहेर या मंडळींनी तळ ठोकला.
हेही वाचा >>>दाभोलकर हत्या प्रकरण : तपास पूर्णत्वाचा अहवाल स्वीकारायचा की नाही? निर्णय घेण्यास सीबीआयला मुदतवाढ
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर नगरसेवकांनी मुख्यालयात संख्याबळानुसार राजकीय पक्षांना कार्यालय उपलब्ध करून देण्यात येते. मुंबई महानगरपालिका सभागृहाची मुदत संपुष्टात आल्यानंतर ही कार्यालये बंद करण्यात येतात. मुंबई महानगरपालिका सभागृहाची मुदत ८ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. त्यामुळे नियमानुसार ही कार्यालये बंद होणे अपेक्षित होते. मात्र निरनिराळ्या कामानिमित्त मुख्यालयात येणाऱ्या माजी नगरसेवकांसाठी ही कार्यालये खुली ठेवावी अशी मागणी सर्वच पक्षाच्या माजी नगरसेवकांनी महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली होती. त्यामुळे ही कार्यालये खुली ठेवण्यात आली होती. मात्र शिंदे गटाच्या समर्थकांनी मुख्यालयातील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे संघर्ष झाला होता. अखेर आयुक्तांनी पक्ष कार्यालयांना टाळे ठोकले होते. मात्र तरीही शिवसेना आणि भाजपचे काही नगरसेवक महानगरपालिका मुख्यालयात येऊन आपापल्या पक्ष कार्यालयांच्या बाहेर बसत आहेत. उद्धव ठाकरे समर्थक नियमितपणे येथे येत आहेत. मंत्रालयातील शिवसेनेचे पक्ष कार्यालय शिंदे समर्थकांनी ताब्यात घेतल्यामुळे उद्धव ठाकरे समर्थकांनी महानगरपालिका मुख्यालयात धाव घेतली आणि प्रशासनाने टाळे ठोकलेल्या पक्ष कार्यालयाबाहेर ठिय्या दिला होता.