मुंबई : दहिसर – मिरारोड मेट्रो ९ मार्गिकेच्या कारशेडसाठी उत्तन, डोंगरीतील ५९ हेक्टर तर कल्याण-तळोजा मेट्रो १२ मार्गिकेतीलह कारशेडसाठी निळजे-निळजेपाडा येथील ४७ हेक्टर जागा दोन ते तीन दिवसात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ताब्यात येणार आहे. या दोन्ही जागा ताब्यात घेण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. या जागा ताब्यात येणार असल्याने आता या दोन्ही मार्गिकेच्या कारशेड बांधण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
एमएमआरडीएकडून दहिसर ते मिरारोड दरम्यान १०.५ किमीची मार्गिकेची उभारणी केली जात आहे. या मार्गिकेचे काम वेगात सुरु असून बऱ्यापैकी काम पूर्ण झाले असतानाही या मार्गिकेतील कारशेडच्या जागेचा प्रश्न सुटत नव्हता. भाईंदर येथील राई, मुर्धा, मोर्वा येथे एमएमआरडीएने कारशेड प्रस्तावित केली होती. मात्र स्थानिकांना या जागेला जोरदार विरोध केल्याने अखेर राज्य सरकारने प्रस्तावित कारशेडची जागा काही महिन्यांपूर्वीच रद्द केली. कारशेडसाठी उत्तन, डोंगरी येथील ५९ हेक्टर जागा निश्चित केली. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने ही जागा एमएमआरडीएच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. आता त्यानुसार ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच ही जागा एमएमआरडीएच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत.




हेही वाचा >>>मंत्रालयात आजपासून दररोज शिवरायांच्या विचारांचे स्मरण
मेट्रो ९ साठी डोंगरीतील जागेसह मेट्रो १२ साठी निळजे-निळजेपाडा येथील जागा देण्याचेही आदेश ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकात्यांनी दिली. निळजे-निळजेपाडा येथील ४७ हेक्टर जागा कारशेडसाठी एमएमआरडीएला दिली जाणार आहे. त्यामुळे आता दोन ते तीन दिवसात या दोन्ही जागा एमएमआरडीएच्या ताब्यात येतील. त्यानंतर पुढील कार्यवाही करत कारशेडच्या कामास सुरवात केली जाईल असेही या अधिकाऱ्याने सांगितले.