मुंबई : राज्य शासनाने शुक्रवारी गृहसचिवासह महत्त्वाच्या पदांवरील २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या. यात मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधीकरणाचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची बदली करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महानगर आयुक्तपदासाठी डॉ. संजय मुखर्जी आणि अश्विनी भिडे यांची नावे चर्चेत असून हे अधिकारी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मर्जीतील मानले जातात. त्यामुळे या दोघांपैकी कुणाची नियुक्ती होते, याकडे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला एक वर्ष पूर्ण होऊ घातले असताना राज्य प्रशासनातील महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. त्यातील २० अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय शुक्रवारी जाहीर करण्यात आला. प्रशासनातील फेरबदलांमध्ये मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या शिफारशींना फारसे महत्त्व न दिल्याची चर्चा आहे. भाजपचा विरोध असताना एमएमआरडीएचे विद्यमान आयुक्त श्रीनिवास यांची बदली करण्यात आल्याचे समजते. श्रीनिवास यांना धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे. गेल्याच आठवडय़ात श्रीनिवास यांच्या नेतृत्वाखाली शिवडी-न्हावाशेवा सागरी मार्गाच्या जोडणीचे काम पूर्ण झाले. तेव्हा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी श्रीनिवास यांचे कौतुकही केले होते. असे असताना त्यांची बदली करण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.




मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रागयडमध्ये काही लाख कोटींची कामे सध्या मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून प्रगतीपथावर आहेत. साहजिकच या प्राधिकरणावर जाण्यासाठी प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांची धडपड सुरू आहे. महानगर आयुक्तपदासाठी डॉ. संजय मुखर्जी, अश्विनी भिडे यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. त्यापैकी भिडे यांच्या नावासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भाजप आग्रही आहे तर, ‘सिडको’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या निकटवर्तीय अधिकाऱ्यांमधील मानले जातात. त्यामुळे या दोघांपैकी कुणाची निवड होते, याकडे लक्ष लागले आहे.