मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक घेण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने (मासु) सोमवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ही निवडणूक व्यापक स्वरूपात होण्यासाठी पुन्हा मतदार नोंदणी होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी निवडणूक स्थगित करणे गरजेचे असल्याची मागणी केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अधिसभा निवडणुकीला स्थगिती देण्यास नकार दिल्याने आज, मंगळवारी मतदानाचा मार्ग मोकळा झाला आहे.

एका वर्षात दोनदा स्थगिती, मतदार नोंदणी व मतदारयादीवर आक्षेप, राजकीय आरोप-प्रत्यारोप, न्यायालयातील लढाई, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आदी कारणांमुळे रखडलेली विद्यापीठाची पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक तब्बल दोन वर्षांनंतर होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार विद्यापीठ प्रशासनाने पुन्हा निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या युवा सेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. याचिकेवर तातडीने सुनावणी घेऊन उच्च न्यायालयाने २४ सप्टेंबर रोजी मतदान आणि २७ सप्टेंबर रोजी मतमोजणीचे आदेश दिले होते. त्यानुसार नोंदणीकृत पदवीधर मतदारांना मंगळवारी सकाळी ९ ते  सायंकाळी ५ या वेळेत मतदान करता येईल. विद्यापीठाच्या https:// mu. eduapp. co. in या संकेतस्थळावर केंद्रनिहाय आणि मतदान कक्षनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>अमित शहा आजपासून दोन दिवस राज्याच्या दौऱ्यावर; मोदी गुरुवारी पुण्यात

ठाकरे गट- अभाविपमध्ये थेट लढत

युवासेना (ठाकरे गट) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचाद्वारे सर्व १० जागांसाठी उमेदवार उभे करण्यात आले आहेत. तर बहुजन विकास आघाडीचे (वसई) ४, छात्रभारती विद्यार्थी संघटनेचा १ आणि ३ जण अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिंदे गटाची युवा सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून एकाही जागेसाठी उमेदवार उभा करण्यात आलेला नाही. त्यामुळे, यंदाची निवडणूक थेट युवासेना (ठाकरे गट) आणि अभाविपमध्ये होणार आहे. अपक्ष उमेदवारांची मतेही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

१० जागांसाठी २८ उमेदवार

●खुल्या प्रवर्गातील ५ जागांसाठी १५, तर प्रत्येकी १ जागा असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातून २, अनुसूचित जमाती प्रवर्गातून ३, विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती प्रवर्गातून ३, इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी ३, महिला प्रवर्गातून २ असे १० जागांसाठी एकूण २८ उमेदवार रिंगणात

●१३ हजार ४०६ नोंदणीकृत पदवीधर मतदार आहेत. विद्यापीठ परिक्षेत्रातील ३८ मतदान केंद्रे, ६४ मतदानकक्ष

Story img Loader