मुंबई : केरळमध्ये मोसमी वारे दाखल झाल्यानंतर राज्यातही मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाने महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांना उष्णतेचा इशारा दिला आहे. यामुळे नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांसाठी महाराष्ट्रासह मध्य भारतामधील काही भागांतील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटका बसणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कोकण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाकाडून वर्तवण्यात आला आहे.




हेही वाचा >>>शरद पवारांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
मध्य महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात पाऊस, तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, देशात मोसमी वाऱ्यांच्या हालचालींना वेग आला असून बिपरजॉय चक्रीवादळ येत्या ४८ तासांत आणखी तीव्र होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे या चक्रीवादळाचा परिणाम देशासह राज्यातही पाहायला मिळणार आहे. हवामान खात्याकडून आपत्ती व्यवस्थापन पथकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, पालघर, कोकण किनारपट्टी भागामध्ये चक्रीवादळाचा परिणाम होणार असून गुजरातलाही या चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागांमध्ये मोठ्या लाटा उसळतील, तर मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह लाटा उसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हेही वाचा >>>जीवे मारण्याची धमकी आल्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाले…
मोसमी वाऱ्याची प्रगती
शुक्रवारी मोसमी वाऱ्यांनी प्रगती केली नाही. वाऱ्यांची सीमा शुक्रवारी कन्नूर, कोडाईकनाल, अदीरामपट्टीनम या भागात होती. पुढील २४ तासांमध्ये मध्य अरबी समुद्रात मोसमी वाऱ्यांना आणखी प्रगती करण्यास अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाने सांगितले. तसेच उर्वरित केरळ, तामिळनाडूनचा काही भाग, कर्नाटकचा काही भाग आणि बंगालच्या ईशान्य भागात मोसमी वाऱ्यांना पुढील दोन दिवसांमध्ये प्रगती करण्यास पोषक वातावरण आहे, असेही हवामान विभागाने जाहीर केले आहे.