वाढत्या प्रदुषणाला आळा घालणे, तसेच पर्यावरण संवर्धनासाठी विजेवर धावणाऱ्या वाहनांच्या वापराला राज्य सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत असून विजेवर धावणाऱ्या वाहनांची खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढू लागला आहे. राज्यात १ एप्रिल २०२२ ते ३ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत विजेवर धावणाऱ्या ५० हजार २८८ वाहनांची नोंदणी झाली आहे. राज्य सरकारने २०२५ पर्यंत नोंदणी होणाऱ्या नव्या वाहनांपैकी दहा टक्के वाहने विजेवर धावणारी असतील असा संकल्प सोडला आहे.

हेही वाचा >>>Dasara Melava 2022 : कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात पावसाची हजेरी

पारंपरिक इंधनाचा तुटवडा आणि प्रदुषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने विजेवर धावणाऱ्या वाहनांबाबतचे धोरण जाहीर केले. त्याला गती देण्यासाठी राज्य सरकारनेही आपले धोरण जाहीर केले. विजेवर धावणाऱ्या वाहनांच्या मागणीत वाढ व्हावी म्हणून त्यांच्या खरेदीवर प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विजेवरील दुचाकीसाठी कमाल दहा हजार रुपये, मोटारगाडीसाठी दीड लाख रुपये, बससाठी २० लाख रुपये, प्रवासी रिक्षा आणि मालवाहू रिक्षासाठी २० हजार रुपये आणि अन्य वाहनांसाठीही सवलत दिली आहे. या सवलतींमुळे विजेवरील वाहनांच्या खरेदीत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

हेही वाचा >>> Dasara Melava 2022 : शिवसैनिकांच्या घोषणाबाजीने दादर दुमदुमले

राज्यात २०१९-२० मध्ये विजेवर धावणाऱ्या सात हजार ४०० वाहनांची, एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ मध्ये ५१ हजार ४२६ वाहनांची नोंद झाली होती. आता विजेवर धावणाऱ्या वाहनांच्या नोंदणीत वाढ झाली असून एप्रिल २०२२ ते ३ ऑक्टोबर २०२२ काळात राज्यात ५० हजार २८८ वाहनांची नोंदणी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईतील अंधेरी आरटीओत एक हजार २३७, बोरिवली आरटीओत एक हजार २२४, ताडदेव आरटीओत एक हजार ३१६ आणि वडाळा आरटीओत एक हजार ३७ वाहनांची नोंद झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.