बंडखोरांना नकोशा झालेल्या अधिकाऱ्यांचे बदली सत्र सुरू – मुंबई महानगरपालिकेत नाराजीचा सूर

या प्रकारामुळे महानगरपालिकेतील अधिकारी हादरले आहेत

बंडखोरांना नकोशा झालेल्या अधिकाऱ्यांचे बदली सत्र सुरू – मुंबई महानगरपालिकेत नाराजीचा सूर
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजप सक्रिय झाले असून, अनुकूल नसलेल्या मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र सुरू झाले आहे. बंडखोर आमदारांच्या इशाऱ्यामुळे काही अधिकाऱ्यांची अल्पावधीतच वारंवार बदली करण्यात येत आहे. या प्रकारामुळे मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी हादरले असून अधिकारी वर्गामध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजपचे सरकार सत्तेवर आले. त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलू लागली असून मुंबई महानगरपालिकेतील सत्ता काबीज करण्यासाठी शिंदे गट आणि भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. हमखास निवडून येणारे शिवसेनेचे माजी नगरसेवक हेरून त्यांना आपल्या गटात सहभागी करण्याच्या दृष्टीने हालचाली शिंदे गटाकडून सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे आपल्याला अनुकूल नसलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांतील अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्याचे सत्र सुरू झाले आहे.

मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांवरही बंडखोर गटाने लक्ष केंद्रीत केले –

मुंबईमधील शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे, मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे आणि सदा सरवणकर बंडखोरी करीत शिंदे गटात सहभागी झाले. त्याचपाठोपाठ मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांनीही बंडाचा झेडा फडकविला. आता मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देण्याची तयारी बंडखोरांनी सुरू केली आहे. केवळ शिवसेनेच्या माजी नगरसेवकांवरच नव्हे तर मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांवरही बंडखोर गटाने लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातील प्रतिकूल ठरणाऱ्या मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र सुरू झाले आहे.

दहिसरमधील मुंबई महानगरपालिकेच्या आर-उत्तर विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांची काही दिवसांपूर्वी तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांची एन विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तपदी बदली करण्यात आली. मात्र भाजप आमदाराच्या विरोधामुळे अंडे यांची एम-पश्चिम विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तपदी नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले. मात्र याही परिसरातील बंडखोर नेत्यांमुळे अंडे यांना रूजू होता आले नाही. आता पुन्हा एकदा त्यांची अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदावर रूजू होण्याचे आदेश जारी झाले आहेत.

अधिकारी वर्गामध्ये नाराजीचा सूर –

दक्षिण मध्य मुंबईमधील दादर, माहीम, धारावीचा समावेश असलेल्या जी-उत्तर विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांची तडकाफडकी ई विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची पुन्हा एकदा मालाड परिसरातील पी-उत्तर विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. अवघ्या काही दिवसांमध्येच दिघावकर यांची ई विभागातून उचलबांगडी करण्यात आली आहे. जी-उत्तर विभाग कार्यालयाच्या हद्दीत माहीम विधानसभा मतदारसंघात बंडखोर आमदार सदा सरवणकर, तर ई विभाग कार्यालयाचा समावेश असलेल्या भायखळा मतदारसंघातील यामिनी जाधव आमदार आहेत. एफ-दक्षिण विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांची ए विभाग कार्यालयात, पी-उत्तरमधील महेश पाटील यांची एफ-दक्षिण विभागात, परिवहन विभागातील कायर्कारी अभियंता अजयकुमार हरिहर यादव यांची ई विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्याचबरोबर घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या उपायुक्त संगीता हसनाळे यांची परिमंडळ-१च्या उपायुक्त म्हणून, तर परिमंडळ – १ च्या उपायुक्त चंदा जाधव यांची घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या उपायुक्तपदी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाल्यामुळे अधिकारी वर्गामध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The transfer of officers who are not wanted by the rebels mumbai print news msr

Next Story
भेसळयुक्त खाद्यतेलाविरोधात धडक मोहीम; राज्यभरातून खाद्यतेलाचे २७० नमुने ताब्यात
फोटो गॅलरी