scorecardresearch

मुंबई मंडळाच्या सोडतीची प्रतीक्षा संपेना; अद्याप जाहिरातीची तयारी नाही, घरांची संख्याही अनिश्चित

मंडळाने अद्याप सोडतीत विक्री करण्यात येणाऱ्या घरांची संख्याही निश्चित केलेली नाही. सोडतीची तयारीही अंत्यत संथगतीने सुरू आहे.

building01
( Image – लोकसत्ता टीम )

मुंबई : मुंबईकरांना म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीची २०१९ पासूनची प्रतीक्षा असून गेल्या वर्षीपासून सोडतीच्या जाहिरातीसाठी केवळ तारखांवर तारखा देण्यात येत आहेत. आता मार्चमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्याची तारीखही चुकण्याची शक्यता आहे. मंडळाने अद्याप सोडतीत विक्री करण्यात येणाऱ्या घरांची संख्याही निश्चित केलेली नाही. सोडतीची तयारीही अंत्यत संथगतीने सुरू आहे.

मुंबई आणि कोकण मंडळाच्या सोडतीतील घरांना सार्वधिक मागणी आहे. या सोडतीकडे लाखो इच्छुकांचे लक्ष लागलेले असते. असे असताना मागील वर्षभरापासून सोडतीच्या केवळ तारखांवर तारखा जाहीर केल्या जात आहेत. मुंबई मंडळाची शेवटची सोडत २०१९ मध्ये काढण्यात आली होती. त्यामुळे भविष्यात काढण्यात येणाऱ्या सोडतीच्या प्रतीक्षेत मुंबईकर आहेत. दरम्यान, नुकतीच कोकण मंडळाची सोडत जाहीर झाली. मात्र मुंबई मंडळाच्या सोडतीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. मुंबई मंडळाच्या सोडतीची जाहिरात मार्चमध्ये प्रसिद्ध होईल, असे सांगण्यात येत आहे. मार्च महिन्यातील १० दिवस उलटून गेल्यानंतरही मुंबई मंडळाने सोडतीच्या जाहिरातीची तयारी सुरू केलेली नाही.

हेही वाचा >>> सुट्ट्या पैशांवरून खळखळ टाळण्यासाठी रिक्षा-टॅक्सीचालकांनी ऑनलाईन व्यवहार करावा, मुंबईकरांची वाढती मागणी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडळाचा वांद्रे विभाग वगळता इतर विविध विभागांकडून घरांची कोणतीही माहिती पणन विभागाकडे सादर करण्यात आलेली नाही. पणन विभाग अनेक दिवसांपासून घरांची माहिती मागवत आहे. मात्र ही माहिती उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, सोडतीतील अंत्यत महत्त्वाचा असा भाग असलेले ‘टेनामेंट मास्टर’च (घरांची संख्या, किंमती आदी) निश्चित होताना दिसत नाही. त्यामुळे जाहिरात रखडल्याचे समजते. मार्चअखेरपर्यंत घरांची संपूर्ण माहिती घेण्यात येईल. त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, असे मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी सांगितले. सोडतीच्या जाहिरातीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-03-2023 at 17:19 IST