मुंबई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा वेगाने खालावू लागला असून सातही धरणांमध्ये मिळून सध्या केवळ १२.७६ टक्के पाणी शिल्लक आहे. पुढचे केवळ २५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असताना राखीव साठय़ाचा वापर करण्यास राज्य सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे पाऊस लांबल्यास मुंबईकरांची तहान कशी भागवायची, असा प्रश्न महापालिकेसमोर आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उध्र्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांत मिळून केवळ १२.७६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उध्र्व वैतरणा धरणातील वापरण्यायोग्य पाणीसाठा शून्यावर आला आहे. उपशामुळे अन्य धरणांतील पाणीसाठाही वेगाने कमी होत आहे. त्यामुळे पुरेसा पाऊस पडेपर्यंत उपलब्ध पाणीसाठय़ातूनच मुंबईकरांची तहान भागवावी लागणार आहे. सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा केवळ २५ दिवस पुरेल, असे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सात धरणांतून मुंबईला दररोज ३,८०० दशलक्षलीटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. पावसाळय़ात धरणक्षेत्रात मुबलक पाऊस झाल्यानंतर धरणांमधील पाणीसाठय़ात वाढ होईल. तोपर्यंत उपलब्ध पाणी पुरवावे लागणार आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिका प्रशासनाने भातसा व उध्र्व वैतरणा धरणातील राखीवसाठा वापरण्यासाठी राज्य सरकारला पत्र पाठवले आहे. या पत्रावर सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे पालिका प्रशासन हवालदिल झाले आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा कमालीचा कमी झाल्याने चिंतेत भर पडली आहे. गेल्यावर्षी याच दिवशी १७.८१ टक्के, तर २०२१मध्ये १४.६१ टक्के पाणीसाठा होता. कोणत्या धरणात किती साठा?मोडक सागर : २८.८३ टक्केतानसा : २५.०६ टक्केमध्य वैतरणा : १०.६७ टक्केभातसा : ११.१९ टक्केविहार : २७.९० टक्केतुळशी : ३२.१८ टक्के यंदा सर्वात कमी पाणी३१ मे २०२३ : १,८४,७५३ दशलक्ष लिटर (१२.७६ टक्के)३१ मे २०२२ : २,५७,७३३ दशलक्ष लिटर (१७.८१ टक्के)३१ मे २०२१ : २,११,५०९ दशलक्ष लिटर (१४.६१ टक्के)