मुंबईः ॲपवरून अनोळखी कामगारांना दिवाळीनिमित्त साफसफाईसाठी बोलावणे दहिसरमधील महिलेला भलतेच महागात पडले. त्या कामगारांसोबत आलेल्या एका व्यक्तीने घराची व परिसराची पाहणी केली आणि त्यानंतर घरात शिरून कपाटातील महागडे दागिने चोरले. एमएचबी पोलिसांना आरोपीला अटक करण्यात य़श आले आहे. अरबाज फिरोज खान असे या आरोपीचे नाव असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारे चोरी केल्याचा संशय असून त्याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
दहिसर येथील जे. एस. रोडवरील ऋषिकेश सोसायटीमध्ये ५५ वर्षीय तक्रारदार महिला वास्तव्यास आहे. दिवाळीसाठी घरातील दागिन्यांना पॉलिश करण्यासाठी त्यांनी कपाट उघडले असता त्यात सोन्या-चांदीचे दागिने, दोन महागडी घड्याळ असा लाखो रुपयांचा ऐवज नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा प्रकार मंगळवारी उघडकीस येताच त्यांनी एमएचबी पोलिसात तक्रार केली. त्यांना १२ ते २२ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला. त्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
हे ही वाचा… सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड ‘लोकसत्ता लेक्चर’मध्ये विचार मांडणार; लोकसत्ता ऑनलाइनच्या युट्यूब चॅनलवर लाइव्ह
तपासात या महिलेने दिवाळीनिमित्त एका मोबाइल ॲपवरून साफसफाई सुविधेची नोंदणी केली होती. त्यानंतर त्यांच्या घरी साफसफाईसाठी दोन कामगार आले होते. या दोघांना सोडण्यासाठी त्यांचा एक मित्र आला होता. घरात साफसफाई केल्यानंतर ते सर्वजण निघून गेले. मात्र २१ ऑक्टोंबर रोजी सकाळी पावणेनऊ वाजता त्यापैकी दोनजण पुन्हा सोसायटीमध्ये आले होते. त्यांनी नोंदवहीत त्यांचे नाव आणि मोबाइल क्रमांक लिहिला होता. त्यामुळे पोलिसांनी सोसायटीमधील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाची तपासणी केली. त्यात संबंधित व्यक्तींची ओळख पटली. या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्यापैकी अरबाज खाननेच तक्रारदार महिलेच्या घरात शिरून चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.
हे ही वाचा… कांजूरमार्ग कारशेड पुन्हा वादात, मेट्रो ६ मार्गिकेच्या कारशेडच्या कामाला न्यायालयाची स्थगिती
दिवाळीनिमित्त घरात साफसफाई करताना अनोळखी व्यक्तींना घरात बोलावले होते. त्याच्यासोबत आलेल्या आरोपीने पाहणी करून चोरी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने पलायन केले होते. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली.