नाटय़कर्मी अतुल पेठे यांच्याकडून साहित्यिकांच्या भूमिकेचे समर्थन

 ‘महाराष्ट्राला आर्थिक, सामाजिक, राजकीय दारिद्रय़ कळते. परंतु सांस्कृतिक दारिद्रय़ कळत नाही.

‘अस्मि प्रतिष्ठान’च्या वतीने मुलुंडमधील वझे-केळकर महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये रविवारी आयोजित करण्यात आलेल्या  सोहळ्यात यंदाचा ‘अस्मि कृतज्ञता पुरस्कार’ अतुल पेठे यांना समाजसेवक गजानन खातू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी नाटय़क्षेत्रातील कलावंत व नाटय़रसिक उपस्थित होते.

आम्ही कलावंत बोलणारच!

‘साहित्यिक आणि कलावंत यांना राजकीय भान असतेच. आणि आम्ही कलावंत ते वेगवेगळ्या माध्यमांतून व्यक्त करणारच,’ अशा स्पष्ट शब्दांत ख्यातनाम नाटय़दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते आणि लेखक अतुल पेठे यांनी कलावंतांनी वा साहित्यिकांनी राजकीय भूमिका घेण्याच्या भूमिकेचे समर्थन केले.

‘अस्मि प्रतिष्ठान’च्या वतीने मुलुंडमधील वझे महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘अस्मि कृतज्ञता पुरस्कार’ सोहळ्यामध्ये ते बोलत होते. यंदाचा ‘अस्मि कृतज्ञता पुरस्कार’ अतुल पेठे यांना समाजसेवक गजानन खातू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्यासह नाटय़क्षेत्रातील कलावंत व नाटय़रसिक उपस्थित होते.

‘महाराष्ट्राला आर्थिक, सामाजिक, राजकीय दारिद्रय़ कळते. परंतु सांस्कृतिक दारिद्रय़ कळत नाही. पुणे, मुंबई ही शहरे वगळता नाटकासाठी पुरेसा अवकाश राहिलेला नाही. प्रायोगिक नाटक ही नाटय़भूमीची प्रयोगशाळा आहे. तिचीही दुर्दशा झाली आहे. शहादामध्ये ‘समाजस्वास्थ’ सादर होण्यापूर्वी गेल्या २५ वर्षांमध्ये एकही नाटक झालेले नव्हते, यावरून नाटय़क्षेत्राची झालेली दशा समजून येते, असे अतुल पेठे यांनी म्हटले. नाटक हे जिवंत माध्यम असून ते आपल्या विचारांवर, अंत:चक्षूंवर परिणाम करत असते. ते आता हरवत चालले आहे. गावागावातून ‘रियालिटी शो’ मात्र होत असतात. चार पदरी रस्ते म्हणजे विकास नव्हे. माणसांची मने जिवंत असायला हवी. त्यामुळे प्रायोगिक नाटकांच्या पडझडीला वाचा फोडण्यासाठी आम्ही बोलणारच,’ अशा शब्दांत अतुल पेठे यांनी ‘विकासा’चा खरा अर्थ उलगडला.

महाराष्ट्राच्या प्रबोधनकाळातील करकरीत बुद्धिवादीपणा आताच्या काळात कसा भावनाविवश झाला आहे, यावर भाष्य करताना ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर म्हणाले, ‘आताचा मराठी माणूस हा कुणाला काय वाटेल याचा विचार करून हिशेब मांडत बोलतो. त्याला त्याचे विचार निर्भीडपणे व्यक्तच करता येत नाहीत. महाराष्ट्र विचारांना घाबरणारा कधीच नव्हता. त्या काळी र. धों. र्कवेसारख्या समाजसुधारकांनी समाजाची भीड चेपून प्रबोधनाचा झरा खळखळ वाहता केला. परंतु त्याच राज्यातील सध्याचा समाज पाहता, हाच तो महाराष्ट्र का, असा प्रश्न पडायला लागतो. तेव्हा अशा दबलेल्या, घुसमटलेल्या समाजामध्ये ‘समाजस्वास्थ’सारख्या कलाकृती कुठे तरी आशेचा किरण दाखवितात.’ ‘आमच्या काळामध्ये आम्ही कायम सरकारवर टीका करत सरकार कसे निकृष्ट आहे, हे सांगत राहिलो. परंतु आता काळ आणि परिस्थिती दोन्ही बदलली आहे. त्यामुळे आता प्रत्येक वेळेस सरकारकडे बोट न दाखवता अतुल पेठेसारख्या कलांवताप्रमाणे बदलासाठी स्वत:च पुढे येणे अत्यावश्यक आहे. तेव्हा आपल्या हक्कांसाठी समूह म्हणून एकत्र येत बदलाची सुरुवात करणे हेच आज समाजासमोर उभ्या राहिलेल्या प्रश्नांचे उत्तर आहे,’ असे गजानन खातू यांनी सांगितले.  या कार्यक्रमाच्या निमित्ताने कवयित्री आणि लेखिका नीरजा यांच्या ‘स्त्री’त्वातून सुरुवात करून माणूसपणाचा शोध घेणाऱ्या कथांचा ‘अस्वस्थ मी! अशांत मी!’ या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

फाडफाडवाचनशैली

या कार्यक्रमाच्या निमित्ताने अतुल पेठे यांनी आपल्या कारकीर्दीतील ११००वा प्रयोग सादर केला. या वेळी त्यांनी डॉ. चंद्रशेखर फणसळकर यांच्या ‘टोचदार’ लेखणीतून साकारलेल्या ‘परवा आमचा पोपट वारला’ या नाटकाचे अभिवाचन आपल्या खास शैलीमध्ये केले. नाती, कुटुंब, समाजव्यवस्था, धर्म या बाबी माणसाच्या वैयक्तिक जीवनाशी निगडित असून प्रत्येक जण त्याकडे सापेक्षतेने पाहत असतो, हेही नाटय़कथा सांगते. पेठे यांनी त्यांच्या ‘फाडफाड’ वाचनशैलीत प्रेक्षकांसमोर हे अभिवाचन सादर केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Theater artist atul pethe role of the writers

ताज्या बातम्या