scorecardresearch

स्त्रीत्वाचा वेध घेणारा रंगमंचीय आविष्कार; ‘ती’ची भूमिका‘: लोकसत्ता’चा विशेष कार्यक्रम

स्त्रीत्व म्हणजे तिचे गुणधर्म, तिची गुणवैशिष्टय़े, तिचा स्वभाव, तिचे असणे-दिसणे सर्व काही.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : स्त्री सक्षम झाली की देश सक्षम होतो. स्त्री सक्षमीकरणाची ही प्रक्रिया साधीसरळ नाही. स्त्रीत्वाच्या मनात रुजलेल्या पारंपरिक संकल्पना मोडून काढत राज्यात गेल्या दीड शतकात घडवलेला बदल नाटकातील स्त्रीपात्रांच्या माध्यमातून उलगडणारा ‘ती’ची भूमिका हा विशेष कार्यक्रम ‘लोकसत्ता’ने आयोजित केला आहे.

स्त्रीत्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न आदिम काळापासून सुरू आहे. साहित्य, नाटय़, चित्र, तत्वज्ञानातूनही स्त्रीत्वाचा हुंकार उमटत आला आहे. मार्च महिना हा एकाअर्थी या स्त्रीत्वाच्या जागराचा. ८ मार्च हा जगभरात स्त्रीचा सन्मानदिन म्हणून साजरा केला जातो. याच जागराचे निमित्त साधून लोकसत्ताने ‘ती’ची भूमिका या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

स्त्रीत्व म्हणजे तिचे गुणधर्म, तिची गुणवैशिष्टय़े, तिचा स्वभाव, तिचे असणे-दिसणे सर्व काही. या सगळय़ा गोष्टी आपल्याकडे मुळात समाजाने ठरवून दिलेल्या आहेत. मात्र सावित्रीबाई फुलेंसारख्या एका सामान्य स्त्रीने या रूढ चौकटीविरूद्ध बंड केले. तिने स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली केली. सावित्रीबाईंनी हे जे बदलाचे बीज रोवले ते पुढे अनेक बंडखोर, विचारवंत, सुधारक स्त्रियांच्या माध्यमातून फोफावत गेले. हे बदलत गेलेले स्त्री विचार साहित्यातून उमटले, तसेच महाराष्ट्रात ते नाटकांमध्येही मोठय़ा प्रमाणावर प्रतिबिंबित झाले. काळाच्या प्रवाहात महत्त्वाच्या ठरलेल्या अशा आठ प्रातिनिधिक नाटकांमधून बदलत गेलेली ही ‘ती’ची भूमिका रंगमंचावर सादर होणार आहे.

आठ नाटकांचे प्रवेश आणि दहा नायिकांच्या माध्यमातून रंगणारा संवाद एका सूत्रात गुंफण्याचे काम अभिनेत्री मृणाल कुलकर्णी सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून करणार आहेत. तर एका वेगळय़ा संकल्पनेवर आधारित संवाद आणि अभिनयातून उलगडणारा हा नाटय़ाविष्कार लेखिका, अभिनेत्री मुग्धा गोडबोले यांनी शब्दांकित केला आहे. कार्यक्रमाचे संयोजन उत्तरा मोने यांनी केले आहे.

सामाजिक, वैचारिक बदल लोकांसमोर ठेवण्यात कायम अग्रेसर राहिलेल्या ‘लोकसत्ता’ने स्त्रियांमधील या बदलाचा, त्यांच्यातील समृद्ध होत गेलेल्या जाणिवांचा, व्यक्ती ते समष्टीपर्यंत तो बदल पोहोचवणाऱ्या ‘ती’च्या भावनांचा, विचारांचा पट या अनोख्या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर ठेवला आहे.

सादरीकरण..

प्रतीक्षा लोणकर, विभावरी देशपांडे, श्रृजा प्रभुदेसाई, मधुरा वेलणकर, आशीष कुलकर्णी, आदिती सारंगधर, आस्ताद काळे, संपदा कुलकर्णी, राधा धारणे, पल्लवी वाघ केळकर, मानसी जोशी, शुभांगी सदावर्ते, शुभांगी भुजबळ, शिल्पा साने आदी कलावंत या कार्यक्रमात रंग भरणार आहेत.

कधी आणि कुठे?

गुरूवारी, २४ मार्च २०२२ रोजी प्रभादेवीतील रवींद्र नाटय़मंदिर येथे संध्याकाळी ६ वाजता हा अनोखा रंगमंचीय आविष्कार पाहायला मिळणार आहे.

मुख्य प्रायोजक  

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)

सहप्रायोजक 

झी मराठी, श्री. धूतपापेश्वर लिमिटेड, एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँक लि., दोस्ती ग्रुप

संकल्पना..

या कार्यक्रमात

‘व्हय मी सावित्रीबाई’, ‘हिमालयाची सावली’ , ‘शांतता! कोर्ट चालू आहे’, ‘किमयागार’, ‘चारचौघी’, ‘मिस्टर अँण्ड मिसेस’, ‘प्रपोजल’ आणि ‘संगीत देवबाभळी’ अशा आठ नाटकांमधील प्रवेश सादर केले जाणार आहेत.

प्रवेशासाठी.. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. प्रवेशिका सोमवारी, २१ मार्चपासून सकाळी ९ ते १२ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत नाटय़गृहावर उपलब्ध असतील. एका व्यक्तीसाठी एक प्रवेशिका उपलब्ध होईल. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Theatrical invention that explores femininity loksatta special program akp

ताज्या बातम्या