खटल्याची सुनावणी लांबल्याचा राग म्हणून एका कच्च्या कैद्याने संतापून न्यायाधीशांवरच चप्पल भिरकावण्याची घटना मंगळवारी मुंबईतील सत्र न्यायालयात घडली.
चोरीच्या आरोपाअंतर्गत मदन चव्हाण याच्यावर खटला चालवण्यात येत आहे. मात्र खटल्याची सुनावणी लांबतच चालल्याचा संताप येऊन चव्हाण याने मंगळवारी सुनावणीच्या वेळेस चप्पल न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली.
चव्हाण याला २००३ मध्ये चोरीच्या आरोपात अटक करण्यात आली. तेव्हापासून तो आर्थर रोड कारागृहात बंदिस्त आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. व्ही. पाटील यांच्यासमोर त्याच्यावर खटला चालवण्यात येत आहे. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळेस त्याने न्यायाधीशांवर चप्पल भिरकावून शिवीगाळ केली. या प्रकरणी चव्हाणवर नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.