मुंबई : अतिवृष्टीग्रस्तांसाठी  जाहीर केलेल्या ११ हजार ५०० कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये मुंबईतील बाधितांच्या मदतीचा कोणताही उल्लेख नाही. अतिवृष्टीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना महाविकास आघाडी सरकारने नुकसान भरपाईपासून वंचित ठेवल्याची टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. सरकारच्या या उदासीनतेविरोधात मुंबई भाजपच्या वतीने लवकरच आंदोलन करणार असल्याचा इशारा भातखळकर यांनी दिला आहे.

मुंबईत  झालेल्या अतिवृष्टीमुळे झोपडपट्टी, चाळीत राहणारे नागरिक, छोटे दुकानदार, मध्यमवर्गीय यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. चेंबूर, मुलुंड या ठिकाणी दरड कोसळून ४० पेक्षा जास्त नागरिकांचे नाहक बळी गेले. हनुमाननगर, पोयसर, दिंडोशी, गोवंडी, निबारपाडा, विक्रोळी या परिसरात शेकडो घरे जमीनदोस्त झाली, असे त्यांनी सांगितले.