अपघात क्षेत्रांवर कायमस्वरूपी तोडगा नाहीच

२०१४ पासून ते आतापर्यंत राज्यात एक हजार ३२४ अपघात क्षेत्रांची नोंद झाली आहे.

सात वर्षांत उपाययोजना करण्यात अपयश

मुंबई : धोकादायक वळणदार रस्ते, संरक्षक भिंत किंवा कठडे नसणे इत्यादी राज्यातील रस्ते अपघातांस कारणीभूत ठरणाऱ्या ‘अपघात क्षेत्रां’वर (ब्लॅक स्पॉट) गेल्या सात वर्षांत कायमस्वरूपी तोडगा काढण्यास राज्यातील सर्वच यंत्रणांना अपयशच आले आहे. १,३२४ अपघात क्षेत्रांपैकी ७५७ क्षेत्रांवरच कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

२०१४ पासून ते आतापर्यंत राज्यात एक हजार ३२४ अपघात क्षेत्रांची नोंद झाली आहे. २०१६ नंतर यात ५८५ अपघात क्षेत्रांची भर पडल्याने यात वाढ झाली होती. मद्य पिऊन किंवा बेदरकारपणे वाहन चालविणे, ओव्हरटेक करणे ही प्रमुख कारणे अपघातांमागे असली तरी रस्त्यांची दुरवस्था, धोकादायक वळणे, संरक्षक भिंत किंवा कठडे नसणे, गतिरोधक नसणे हे घटकदेखील तेवढेच कारणीभूत ठरत आहेत. ५०० मीटर क्षेत्रामध्ये सलग तीन वर्षांत एकूण पाच प्राणांतिक अपघात किंवा गंभीर अपघात अथवा एक किंवा त्यापेक्षा जास्त अपघात झाले असतील अशा अपघात प्रवण क्षेत्रांची (ब्लॅक स्पॉट) माहिती गोळा केली जाते. आजघडीला अपघात क्षेत्रांची संख्या सुमारे १,३२४ इतकी असल्याची माहिती परिवहन विभागातील एका वरिष्ठ  अधिकाऱ्याने दिली.

२०१४ ते २०१६ या काळात ७३९ अपघात क्षेत्रे होती. त्यानंतर त्यात वाढच होत आहे. मुंबईबरोबरच, नाशिक शहर व ग्रामीण, नागपूर, नांदेड, कोल्हापूर, सातारा, अमरावती शहर, औरंगाबाद शहर, नवी मुंबई शहर, पालघर, रत्नागिरी, रायगड, पुणे ग्रामीण, ठाणे शहर व ग्रामीणसह अन्य शहर व ग्रामीण भागांत अपघातक्षेत्र अधिक आहेत. राज्यातील १ हजार ३२४ अपघात क्षेत्रांतील ७५७ क्षेत्रांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

  • अपघात क्षेत्र हे राज्य महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्गाबरोबरच स्थानिक पालिकांच्या अखत्यारित येतात.
  •   सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर ५१० अपघात क्षेत्र होते. यातील ३६५ क्षेत्रांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्या आहेत, तर १४५ क्षेत्रांवर उपाययोजना केल्या जात आहेत.
  • एकूण ४९९ अपघात क्षेत्रांवर करण्यात येणाऱ्या कायमस्वरूपी योजनांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाबरोबरच २१९ क्षेत्रे ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित येतात. तर ८२ क्षेत्रे ही राज्य महामार्ग आणि जिल्ह्य़ातील, तर ३९ क्षेत्रे शहरी भागांतील आणि चार अन्य मार्गावरील आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: There is no permanent settlement on accident area akp

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या