मुंबईतल्या मुलुंड भागात तृप्ती देवरुखकर यांना घर नाकारण्यात आलं. एका इमारतीत हा प्रकार घडल्यानंतर आपल्याला कुठल्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं हे त्यांनी व्हिडीओतून मांडलं आहे. जो व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला. तसंच त्यावर विविध प्रतिक्रियाही उमटत आहेत. राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्याही प्रतिक्रिया समोर आल्या. आज राज ठाकरेंच्या भेटीनंतर तृप्ती देवरुखकर यांनी जितेंद्र आव्हाड यांचीही भेट घेतली. त्यानंतर त्यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाल्या तृप्ती देवरुखकर?

“मी व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर अनेक लोक मला यासंबंधीच्या तक्रारी करत आहेत. मी विविध पक्षातल्या लोकांना याचसाठी भेटते आहे. हा मुद्दा आणखी लोकांपर्यंत पोहचेल, या प्रकरणाकडे नेते मंडळी कशा दृष्टीकोनातून बघत आहेत? हे मला जाणून घ्यायचं आहे. हा कुठल्याही पक्षाचा मुद्दा नाही. मराठी माणसांचा आवाज बुलंद करायचा असेल तर आपण नेत्यांनाच भेटलं पाहिजे. मराठीसाठी सगळ्यांनी एकत्र येऊन या मुद्द्याला बळ दिलं पाहिजे. मी ज्याप्रमाणे व्यक्त झाले तसं इतरही लोक व्यक्त होतील. अनेकदा लोक काही बोलत नाहीत गप्प राहतात. मात्र त्याचवेळी जाब विचारला गेला पाहिजे. हे यापुढे अन्याय सहन करायला नको. महाराष्ट्रात कुठलंच वर्गीकरण आपण सहन करायला नको.” असं तृप्ती देवरुखकर म्हणाल्या.

हे पण वाचा- मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं! कवी सुरेश भटांच्या ‘या’ ओळी पोस्ट करत मनसेचा सरकारला इशारा

मराठी माणूस आवाज उठवत नाही त्याने समोर आलं पाहिजे

मराठी माणूस जर एकत्र आला आणि त्याने याविरोधात आवाज उठवला तर यामागे जी कुठलीही शक्ती असेल ती टिकणार नाही. मी मुलुंडमध्ये राहते. घाटकोपर ते मुलुंड पर्यंत जे काही प्रकल्प सुरु आहेत तिथे विशिष्ट धर्मांसाठीची लेबल्स प्रोजेक्टला दिली गेली आहेत. अशा प्रकारचं लेबलिंग जेव्हा होतं तेव्हा तो प्रकल्प विशिष्ट धर्मासाठी आहे का? तिथे घर घ्यायला गेल्यावर मांस खाणारे अलाऊड नाही, मराठी अलाऊड नाही सांगण्यात येतं. अशा पद्धतीचे कुठलेही नियम नाहीत. बिल्डर हे ठरवू शकत नाहीत असंही तृप्ती देवरुखकर म्हणाल्या.

हे पण वाचा- “मुंबईत मराठी महिलेला घर नाकारलं जाणं ही बाब…”, महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांनी घेतली घटनेची दखल

गुजराती आणि मराठी युद्ध नाही

गुजराती आणि मराठी असं कुठलंही युद्ध नाही. हा प्रश्न फक्त गुजराती लोकांचा नाही. मी त्यांना टार्गेट करत नाही. आपल्या आयुष्यात आपण अनेक चांगल्या गुजराती लोकांच्या संपर्कात येतो. सगळीच माणसं वाईट नसतात. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की मुंबई ही वेगवेगळ्या रंगांची आहे. मुंबईतला मराठी माणूस स्वागत करणारा आहे. आपण इथे अनेक जाती-धर्माच्या लोकांचं स्वागत करतो. त्यांनी इथे येऊन हे आपल्याला सांगणं अपेक्षित नाही की इथे मराठी लोक अलाऊड नाहीत, महाराष्ट्रयीन चालणार नाहीत. तुम्ही अशी इमारत तयार करणार की जिथे फक्त जैनच राहणार, गुजरातीच राहणार अशी मुंबई कधीच नव्हती. ही प्रवृत्ती कुणी निर्माण करु नये, ही प्रवृत्ती निर्माण होत असेल तर ती प्रवृत्ती वेळीच ठेचली गेली पाहिजे.

Story img Loader