आयआयटी बॉम्बे येथील ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी साहिल वाकोडेच्या आत्महत्येनंतर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या तीव्र असंतोषाच्या पार्श्वभूमीवर संस्थेने मोठी कारवाई केली आहे. आयआयटी बॉम्बेचे संचालक शिरीष केदारे यांनी प्राध्यापक सुर्यनारायण दुल्ला यांचे अधिष्ठाता (डीन) पद तात्काळ प्रभावाने निलंबित केलं आहे. यानंतर आता साहिलच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
साहिल वाकोडेचे वडील काय म्हणाले?
साहिल आमचा एकुलता एक मुलगा होता. आम्ही त्याला इथवर आणण्यासाठी खूप संघर्ष केला होता. आता या आयआयटीने माझ्या मुलाला संपवलं आहे. माझ्या मुलासह जातीयवाद करण्यात आला. आम्हाला न्याय हवा आहे असं रविंद्र वाकोडे यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलं आहे. साहिल आयआयटी बॉम्बे येथील ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचा दुसऱ्या वर्गाचा विद्यार्थी होता. त्याने प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी मोबाइल घेऊन जात ChatGPT चा वापर उत्तरं मिळवण्यासाठी केला होता असं आयआयटी बॉम्बे या संस्थेचं म्हणणं आहे. साहिलच्या आत्महत्येनंतर त्याच्या वडिलांनी माझ्या मुलाला या संस्थेने संपवलं असं म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.
साहिलच्या आत्महत्येचं प्रकरण काय? संस्थेच्या पत्रकात काय म्हटलंय?
साहिल रविंद्र वाकोडे हा ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी परीक्षागृहात मोबाईल फोन वापरत असल्याचं आढळून आल्याचा दावा संस्थेने केला आहे. संस्थेने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, या विद्यार्थ्याने उत्तरांचा शोध घेण्यासाठी परीक्षेची प्रश्नपत्रिका चॅटजीपीटीवर अपलोड केली होती. “दिवसाच्या सुरुवातीला, एका परीक्षेदरम्यान हा विद्यार्थी परीक्षागृहात मोबाइल फोन वापरताना आढळला होता. त्याने उत्तरांचा शोध घेण्यासाठी परीक्षेची प्रश्नपत्रिका चॅटजीपीटीवर अपलोड केली होती. विद्यार्थ्यावर कोणतीही शिस्तभंगविषयक कारवाई सुरू करण्यात आली नव्हती. या विषयावर संबंधित शिक्षक आणि विभागप्रमुखांनी विद्यार्थ्याशी चर्चा केली होती, त्याचं समुपदेशन केलं होतं आणि या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, असं आश्वासनही दिलं होतं. त्यानंतर हा विद्यार्थी त्याच्या हॉस्टेलमधील खोलीत परतला. नंतर संध्याकाळी तो त्याच्या खोलीत मृतावस्थेत आढळला”
साहिलच्या आत्महत्येनंतर काय घडलं?
साहिलच्या आत्महत्येनंतर आयआयटीच्या जवळपास ४०० मुलांनी मुख्य इमारतीजवळ जमत घोषणाबाजी सुरू केली. ज्यानंतर या सगळ्याला राजकीय वळणही लागलं आहे. साहिल वाकोडेला न्याय द्या म्हणत हे आंदोलन करण्यात येतं आहे. वाढत्या दबावामुळे आयआयटी बॉम्बेचे संचालक शिरीष केदारे यांनी प्राध्यापक सुर्यनारायण दुल्ला यांचे अधिष्ठाता (डीन) पद तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आलं आहे. आता यानंतर साहिलच्या वडिलांची गंभीर आरोप करणारी प्रतिक्रिया समोर आली आहे. यानंतर आता पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
