लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: मध्य रेल्वेवरील लोकलमध्ये मोबाइल चोरांचा सुळसुळाट झाला असून त्यामुळे प्रवासी आणि रेल्वे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. एका महिलेचा दोन लाख दहा हजार रुपयांचा मोबाइल नुकताच लोकल प्रवासात चोरीला गेला होता. या प्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी चोराचा शोध घेतला असून हेमराज बन्सीवाल (३०) आणि देविलाल चौहान (३२) यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी चोरलेला महिलेचा मोबाइल हस्तगत करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.




हार्बर मार्गावरील टिळकनगर – सीएसएमटी लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यातून तक्रारदार महिला बुधवारी प्रवास करीत होती. सकाळी ११.३० च्या दरम्यान सीएसएमटी येथे लोकल पोहचली असता मोबाइल चोरीला गेल्याचे तक्रारदार महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर महिलेने मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात केली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणी तपास सुरू केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणी केली असता एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करीत असल्याचे निदर्शनास आले. ही व्यक्ती सीएसएमटी स्थानकावरील फलाट क्रमांक १ व २ वर असल्याचे समजताच रेल्वे पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्याने आपले नाव हेमराज बन्सीवाल (३०) असल्याचे आणि कुर्ला येथे राहत असल्याचे सांगितले. दोन लाख १० हजार रुपयांचा मोबाइलबाबत विचारणा केली असता त्याने तो लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात सापडल्याचे सांगितले. तसेच कुर्ला येथील देविलाल चौहानला (३१) हा मोबाइल तीन हजार रुपयांना विकल्याची माहिती त्याने दिली. रेल्वे पोलिसांनी देविलालला त्याच्या घरून ताब्यात घेतले. त्यानंतर हेमराज बन्सीवाल आणि देविलाल चौहान यांना अटक करण्यात आली.