लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : केटरिंगचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून तीन ते चार जणांच्या गटाने केटरिंगचे साहित्ये पळवल्याची घटना चार दिवसांपूर्वी भांडूप परिसरात घडली. याबाबत एका कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

भांडुपच्या भगवती कार्यालयात मध्ये १९ जून रोजी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. तेथे काम करणारे चार ते पाच कर्मचारी आणि येथील सुरक्षारक्षक नेहमी प्रमाणे झोपलेले असताना पहाटे चारच्या सुमारास तीन ते चारजण सभागृहात आले. त्यांनी पहिल्यांदा सुरक्षारक्षकाला मारहाण करून एका खोलीत बंद केले. त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांनाही झोपेतून उठवून एका खोलीत बंद केले. त्यानंतर आरोपींनी केटरिंगसाठी असलेले सामान पळवले. जाताना आरोपींनी सभागृहातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरांच्या वायर देखील कापून टाकल्या होत्या. तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील आरोपींनी कर्मचाऱ्यांना दिली होती.

आणखी वाचा-मुंबई : विरुद्ध दिशेने वाहन चालविल्याप्रकरणी ७३२ गुन्हे

मात्र बाहेर पडल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तत्काळ घडलेल्या घटनेची माहिती मालकाला दिल्यानंतर मालकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी भांडुप पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी एका कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.