मुंबई : पूर्व उपनगरांमध्ये जमिनीखालील एमटीएनलच्या वायर काढून त्यांची चोरी करणारी एक सराईत टोळी सध्या सक्रिय आहे. या टोळीने आतापर्यंत कोट्यवधी रुपये किंमतीच्या वायरची चोरी केल्याचा संशय आहे. पंतनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पूर्व उपनगरातील अनेक भागात एमटीएनएलच्या वायरच्या चोरीच्या घटना घडत आहेत. अशाच प्रकारे घाटकोपरच्या टिळक रोड ते एम. जी. रोड परिसरात २२ एप्रिल रोजी दहा लाख रुपये किमतीची ११०० मीटर वायरची चोरी करण्यात आली होती. त्यामुळे अनेकांचे टेलिफोन आणि इंटरनेट सेवा बंद झाली. एमटीएनलच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत तपास सुरू केला असता जमिनीखाली एक मीटर अंतरावरील तांब्याची वायर अज्ञात चोरांनी लंपास केल्याचे लक्षात आले.

याबाबत एमटीएनलच्या अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीवरून पंतनगर पोलिसांनी ३० एप्रिल रोजी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दोन दिवसांपूर्वी पंतनगर पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली. पूर्व उपनगरतील भांडूपपासून मुलुंड आणि मानखुर्दपर्यंत मोठ्या प्रमाणात वायरची चोरी झाली आहे. या वायर १९८० दशतकात जमिनीखाली टाकण्यात आल्या असून त्यांची किंमत कोट्यवधी रुपये आहे. या टोळीमध्ये एमटीएनलमधील काही कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचा संशय आहे. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत असल्याची माहिती पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे यांनी दिली.