मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) अटल सेतू प्रभावित क्षेत्रात नवनगर अर्थात तिसरी मुंबई वसवणार आहे. या तिसऱ्या मुंबईसाठी उरण, पनवेल, पेण तालुक्यातील १२४ गावांतील जमीन संपादित करावी लागणार आहे. त्यानुसार आता एमएमआरडीएने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचे निश्चित केले असून २७ एप्रिलपासून भूसंपादनाला सुरुवात होणार आहे.
एमएमआरडीएच्या भूसंपादन धोरणानुसार पहिल्यांदा जमीन मालकांना एकतर्फी भूसंपादनाऐवजी मोबदल्याचे तीन पर्याय देण्यात आले आहेत. त्यातील एका पर्यायानुसार २२.५ टक्के विकसित भूखंड परतावा देण्यात येणार आहे.
३२४.४४ चौरसे किमीवर तिसरी मुंबई
मुंबई – नवी मुंबईदरम्यानचा प्रवास १२ मिनिटांत करता यावा यासाठी एमएमआरडीएने अटल सेतू बांधला. अटल सेतूमुळे आसपासच्या परिसरात विकासाच्या संधी निर्माण झाल्या आहेत. विकासाच्या संधी लक्षात घेता एमएमआरडीएने अटल सेतू प्रभावित क्षेत्रात तिसरी मुंबई वसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण तालुक्यांतील ३२४.४४ चौरस किमी क्षेत्रात तिसरी मुंबई वसवली जाणार आहे.
यासाठी तीन तालुक्यांतील १२४ गावांमध्ये भूसंपादन आणि भूवाटप केले जाणार आहे. यासाठीच्या धोरणाला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली. धोरणास मान्यता मिळाल्याने आता त्याची अंमलबजावणी करून भूसंपादन सुरू करण्याचे एमएमआरडीएने निश्चित केले आहे. २७ एप्रिलपासून भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यासाठीचे जाहीर निवेदन शनिवारी एमएमआरडीएने प्रसिद्ध केले आहे. जमीन मालकांची संमती घेऊन भूसंपादन केले जाणार असून जमीन मालकांना तीन पर्याय देण्यात आले आहेत.
जमीन मालकांना तीन पर्याय
धोरणानुसार जमीन मालकांना भूखंडाचा परतावा, रोख भरपाई आणि एफएसआय वा टीडीआर स्वरूपात मोबदला असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. या तीन मोबदल्यामुळे भूसंपादन सुकर होईल, असा विश्वास एमएमआरडीएकडून व्यक्त करण्यात आला आहे. भूसंपादन वेगाने होईल आणि वादविवाद, विलंब टाळला जाईल, असेही एमएमआरडीएकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, २७ एप्रिलपासून सुरू होणारी भूसंपादन प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. आवश्यक कागदपत्रांसह ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
तिसरी मुंबई विकसित करताना आमचा भर लोककेंद्रीत विकासावर आहे. शहरनिर्मिती ही लोकांच्या सहभागातून व्हावी, या विश्वासातून आम्ही जमीन मालकांना विविध पर्याय देत आहोत. या शहर निर्मितीचे यश नागरिकांच्या सहभागावर अवलंबून असणार आहे, अशी प्रतिक्रिया महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी दिली.
