यंदा घरगुती आणि सार्वजनिक गणपतींच्या संख्येत तब्बल ३४ हजारांची भर पडली आहे. यंदा तब्बल २,१७,७६१ गणेशमूर्तीचे भाविकांनी मनोभावे पूजन केले आणि दीड, पाच, सात आणि अकराव्या दिवशी गणरायाला निरोप देण्यात आला.
गेल्या काही वर्षांमध्ये गणेशोत्सवात देखावे, गणेशमूर्तीसाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरात वाढ झाली आहे. तसेच पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या वस्तूंचा देखाव्यातील वापर वाढला आहे. गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये कानठळ्या बसणाऱ्या वाद्यांमुळे सुजाण नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच रस्त्यांमध्येच उभारण्यात येणाऱ्या सर्वाजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांमुळे पादचारी आणि वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही रस्त्यांमध्ये मंडप उभारून धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. न्यायालयाने रस्त्यांवरील मंडपांबाबत कठोर भूमिका घेतल्यामुळे मंडळांची संख्या कमी होईल असे वाटले होते. परंतु यंदा सार्वजनिक गणपतींची संख्या २,९३० ने वाढून १४,६५९ वर पोहोचली आहे. गेल्या वर्षी ती ११,७२९ इतकी होती. यंदा घरगुती गणपतींची संख्या तब्बल २४,१९७ ने वाढून १,९६,१७४ वर पोहोचली आहे.