गुरुवारी मुंबईत पुरस्कार सोहळा; नऊ कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान

मुंबई : ज्येष्ठ भरतनाट्यम् नृत्यांगना व नृत्यगुरू सुचेता भिडे-चापेकर यांना ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार- २०२१’ प्रदान करण्यात येणार आहे. मुंबईत येत्या गुरुवारी (२८ ऑक्टोबर) होणाऱ्या समारंभात चापेकर यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येईल.

यंदाचा ‘दुर्गा पुरस्कार वितरण सोहळा’ दादरमधील शिवाजी पार्क  येथील स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी गुरुवार, २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार’ आणि इतर नऊ कर्तृत्ववान स्त्रियांना प्रदान के ले जाणारे ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ यांच्या वितरणाबरोबरच चतुरस्र साहित्यिक शान्ता शेळके  यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या कविता व गीतांचा शब्दोत्सव, असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. ‘करोना’संबंधीचे सर्व नियम पाळून होणाऱ्या या कार्यक्रमात रसिकांनाही सहभागी होता येणार आहे. त्यासाठीच्या मर्यादित प्रवेशिका प्रत्येक व्यक्तीस एक, याप्रमाणे २६ ऑक्टोबरपासून कार्यक्रमस्थळी विनामूल्य उपलब्ध होणार आहेत.

‘लोकसत्ता दुर्गा’ उपक्रमांतर्गत दरवर्षी नवरात्रीच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या नऊ कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव केला जातो. या पुरस्कारांचे हे आठवे वर्ष आहे. यंदा या उपक्रमांतर्गत प्रतिकूल परिस्थितीतून उभे राहात परित्यक्ता स्त्रियांसाठी कार्य करणाऱ्या अरुणा सबाने, प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन बनवणाऱ्या कार्यकत्र्या-उद्योजक मेधा ताडपत्रीकर, रेशमाच्या किड्यांपासून निघणाऱ्या स्रावाचा मानवी उपचारांसाठी उपयोग करण्याबाबत संशोधन करणाऱ्या अनुया निसळ, रत्नांची पारख करण्याच्या शास्त्रातील तज्ज्ञ व प्रशिक्षक जयश्री पंजीकर, ओडिसी नृत्यातील ज्येष्ठ नृत्यांगना व वंचितांना नृत्यशिक्षणात सामावून घेणाऱ्या नृत्यगुरू झेलम परांजपे, लैंगिक अत्याचारपीडित व कचरावेचकांसाठी मोठे काम उभारणाऱ्या वृषाली मगदूम, गडचिरोलीत आदिवासी स्त्रियांचे संघटन उभे करून त्यांच्या समस्यांसाठी लढणाऱ्या शुभदा देशमुख, ज्येष्ठ कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन, दृष्टिहीनतेवर मात करून जर्मन भाषेत ‘पीएच.डी.’ मिळवणाऱ्या उर्वी जंगम, या ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारा’च्या मानकरी ठरल्या आहेत.

संशोधक नृत्यगुरू

सुचेता भिडे-चापेकर नृत्यांगना व नृत्यगुरू असण्याबरोबरच त्यांच्या संशोधक वृत्तीसाठीही ओळखल्या जातात. तंजावरला जाऊन इतिहासाच्या अभ्यासाद्वारे जुन्या भरतनाट्यम् रचनांचे त्यांनी के लेले संशोधन प्रेरणादायी आहे. भरतनाट्यम् व हिंदुस्थानी संगीताच्या समन्वयातून त्यांनी निर्मिलेली ‘नृत्यगंगा’ ही शैलीदेखील त्यांची वेगळी ओळख. विविध कलांचा एकत्रितपणे विचार करण्याचा त्या सातत्याने मांडत असलेला विचार आणि कलेत स्वत:ची भर घालण्याचे त्यांचे  प्रयत्न प्रशंसनीय आहेत.

मुख्य प्रायोजक :   ग्रॅव्हीटस् फाऊंडेशन

सहप्रायोजक :

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, व्ही.पी. बेडेकर अँड सन्स प्रा. लि., सनटेक रिअल्टी लि., बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., बुलडाणा

पॉवर्ड बाय :   प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, शिवाजीनगर, पुणे, राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलाइजर्स लि.

 टेलिव्हिजन पार्टनर :  एबीपी माझा