मुंबई पालिकेने ‘सर्वांसाठी पाणी’ हे नवे धोरण जाहीर केलं आहे. या योजनेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज(शनिवार) शुभारंभ करण्यात आला. यावेळी पुस्तिकेचे देखील प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रमातील भाषणात बोलताना मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेच्या कामाचं जाहीरपणे कौतुक केलं. तर, विरोधी पक्षाकडून होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर बोलताना, निशाणा देखील साधला. कार्यक्रमास वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मनपा आयुक्त आदींसही उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “माझा जन्म मुंबईचा असल्याने मी पक्का मुंबईकर आहेच आणि एका गोष्टीचा नक्की अभिमान आहे की, मुंबईत जन्मलेला हा राज्याचा पहिला मुख्यमंत्री आहे. मी हाच विचार करत होतो, की कालच्या १ मे रोजी संयुक्त महाराष्ट्राला ६२ वर्षे झाली आणि ६२ वर्षांपूर्वी माझे अजोबा त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या नेत्यांमधील एक नेते होते. पहिल्या पाचमधील एक होते. मागील काही काळातील बदलती मुंबई बघतच आम्ही मोठं झालो आहोत. तेव्हाची मुंबई कशी होती, आताची कशी आहे आणि उद्याची कशी असणार? हा एक मोठा प्रश्नच आहे. ही योजना राबवणारी मुंबई महापालिका ही देशातील पहिली महापालिका आहे. तसंच येत्या काही काळात जास्तीत जास्त इलेक्ट्रीक बस शहरात चालवणारी मुंबई महापालिका ही पहिला महापालिका असणार आहे. महापालिकेच्या शाळांचा दर्जा वाढवण्याचं काम देखील महापालिका करत आहे.”

थापा मारणारे खूप आहेत, परंतु पाठीवर कौतुकाची थाप मारणारे कमी असतात –

तसेच, “हल्ली विचारांचं प्रदूषण व्हायला लागलं आहे. वैचारीक प्रदूषण याबाबत कोणीच विचार केलला नाही. विकृत विचार मांडले जातात. आज आपण जे काय केलेलं आहे, मुंबई महापालिका सर्वप्रथम याची बातमी कदाचित दिसेल. पण नेमकं नाही काय आहे याच्या बातम्या मोठ्या असतात. सर्वांसाठी पाणी हे केवढी मोठी गोष्ट आहे पण हे नाही दाखवणार, यावर नाही बोलणार. यंदा पावसाळ्यात हिंदमात तुंबणार नाही यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करतो आहोत. मुंबई महापालिका जे काही करतेय, त्यासाठी कोणी तरी पाठीवर कौतुकाची थाप दिली पाहिजे. कारण, बाकी तर थापा मारणारे खूप आहेत, परंतु पाठीवर कौतुकाची थाप मारणारे कमी असतात. फसवेगिरीचे धंदे चालणार नाहीत. नुसतंच काहीतरी बोलायचं अच्छे दिन आएंगे, वाट बघा तुम्ही अजून येताय, ही थापेबाजी परवडणार नाही. सतत लोक ते सहन करणार नाही.” असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं.

नुसता विरोध करणं म्हणजे विरोधी पक्ष नाही –

याचबरोबर विरोधकांवर निशाणा साधताना मुख्यमंत्री म्हणाले, “एक तर काम करू द्यायचं नाही आणि केलं तर भ्रष्टाचार झाला असं म्हणत ओरडत सुटायचं. राजकारण जरुर करा पण राजकारणातही एक दर्जा असला पाहिजे. विरोधी पक्ष म्हणजे काय, नुसता विरोध करणं म्हणजे विरोधी पक्ष नाही. तुमच्याकडून काही सूचना आल्या पाहिजेत. त्याचवेळी सरकार चुकत असेल तर जरूर कान उपटा पण सरकार चांगलं काम करत असेल, तर ती देखील एक दिलदारी पाहिजे जी आजच्या विरोधी पक्षात नाही. आता सभेला तर सुरुवात झालेलीच आहे, १४ तारखेला तर मी सभा घेतोच आहे, पण ही सभा म्हणजे उठसूठ इकडे वार तिकडे वार असं नाही करणार, जे काय माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझं काही तुंबलेलं नाही पण मनामध्ये ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत.”