मुंबई : डिझानर अनीक्षा जयसिंघानी हिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांना पाठवलेल्या एका संदेशात तिचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले होते, असा दावा मुंबई पोलिसांनी सोमवारी सत्र न्यायालयात केला.
एवढेच नव्हे, तर आधी अमृता यांना लाच देण्याच्या आणि नंतर त्यांच्याकडून खंडणी उकळण्याच्या या कटात विविध राजकीय व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता आहे, असा दावाही पोलिसांनी केला. तसेच याची चौकशी करणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाला सांगितले. अनीक्षाच्या जामिनाला विरोध करताना मुंबई पोलिसांनी उपरोक्त दावा केला.
अनीक्षाने तिने तयार केलेले कपडे, दागिने आणि पादत्राणे यांचा प्रचार करता यावा यासाठी ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये परिधान करण्याची विनंती अमृता यांना केली होती. अमृता यांचा विश्वास संपादित केल्यावर अनीक्षाने त्यांना ती काही सट्टेबाजांच्या संपर्कात असल्याचे आणि ते त्यांना बक्कळ पैसा मिळवून देऊ शकतात, असे सांगितले. त्यानंतर अनीक्षाने वडील आणि सट्टेबाज अनिल जयसिंघानी याची पोलीस प्रकरणांतून सुटका करण्यासाठी अमृता यांना एक कोटी रुपयांची लाच देऊ केल्याचा आरोपही पोलिसांनी केला.
अनीक्षाच्या वागणुकीने आपण खूपच निराश झाल्याचे आणि तिने संपर्क करू नये याची तजवीज केली. मात्र अनीक्षाने आपल्याला अनोळखी क्रमांकावरून आपल्या घरातील चित्रफिती पाठवल्या. तसेच आपले वडील पवार आणि ठाकरे यांच्या संपर्कात असून या चित्रफिती त्यांना उपलब्ध करण्याची धमकी दिल्याचे अमृता यांनी तक्रारीत म्हटल्याचेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. हा नियोजित कट होता आणि अनीक्षाने उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याभोवताली असलेली सुरक्षा भेदून घरातील चित्रफिती तयार करण्याचे धाडस केले. त्यामुळे या कटाचा खोलवर तपास करण्याची आवश्यकता आहे. अनीक्षाला जामीन मिळाल्यास ती तपासात अडथळा आणून शकेल तसेच अमृता यांना पुन्हा धमकावण्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी सांगितले.
अनीक्षा जयसिंघानी हिला जामीन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस