म्हाडाकडील साडेतीन हजार संक्रमण सदनिका विकासकांच्या ताब्यात!

भाडय़ापोटी १०० कोटी थकीत

(संग्रहित छायाचित्र)

निशांत सरवणकर

जुनी वा मोडकळीस आलेली इमारत रिकामी करायची म्हटली तर म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडे सध्या फक्त २५ सदनिका उपलब्ध आहेत. सुमारे सात हजार संक्रमण सदनिकांपैकी सध्या साडेतीन हजार सदनिका विकासकांच्या ताब्यात आहेत. या विकासकांनी या संक्रमण सदनिकांच्या भाडय़ापोटी म्हाडाचे शंभर कोटी रुपये थकविले आहेत.

जुन्या साडेचौदा हजार इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य शासनाने अलीकडेच धोरणात सुसूत्रता आणली आहे. मात्र या इमारतींचा पुनर्विकास करण्याचे ठरवले गेले तरी या रहिवाशांच्या पर्यायी निवासासाठी म्हाडाकडे सदनिका उपलब्ध नाहीत. म्हाडाच्या अखत्यारीतील ५८ संक्रमण शिबिरात १२ हजार १४७ सदनिका होत्या. यापैकी २० संक्रमण शिबिरांचा पुनर्विकास केल्यानंतर ही संख्या सात हजार ७३७ इतकी झाली आहे. त्यातही चार हजार १३१ संक्रमण सदनिका पुनर्विकास करणाऱ्या विकासकांना भाडेतत्त्वावर देण्यात आल्या होत्या. त्यापैकी म्हाडाला फक्त ७८० सदनिका परत मिळाल्या आहेत. उर्वरित तीन हजार ३५३ सदनिका विकासकांच्या ताब्यात आहेत. या सदनिकांच्या भाडय़ापोटी विकासकांनी जुलै २०२० पर्यंत २०० कोटी रुपये इतके भाडे थकवले होते. मात्र इमारत व दुरुस्ती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी पाठपुरावा करून यापैकी १०९ कोटी भाडे वसूल करण्यात यश मिळविले. मात्र ही बाब संबंधित म्हाडाच्या वसुली अधिकाऱ्यांनी करणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही, असे आढळून आले आहे.

वडाळा येथील ज्ञानेश्वर नगर तसेच प्रतीक्षानगर येथील ८३ सदनिका मयूर डेव्हलपर्सने ऑगस्ट २००० पासून तर जानकी डेव्हलपर्सने प्रतीक्षानगर येथील ७० संक्रमण सदनिका २००१ पासून ताब्यात ठेवल्या आहेत. सैफी बुऱ्हाणी ट्रस्टने माझगावच्या न्यू हिंद मिल येथील १०७४ तर चुनाभट्टीच्या स्वदेशी मिलमधील ४५४ संक्रमण सदनिका अनुक्रमे २०१२ आणि २०१५ पासून आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत. न्यू हिंद मिलमधीलच २८० सदनिका सराह हौसिंग डेव्हलपमेंटने गेल्या सात वर्षांनंतरही म्हाडाला परत केलेल्या नाहीत. ताडदेवच्या बहुचर्चित एस. डी. कॉर्पोरेशनच्या ताब्यात १९९६ पासून म्हाडाच्या १६८ सदनिका आहेत. याशिवाय मालवणी, मागठाणे आणि दहिसर येथील १४२ संक्रमण सदनिकांवर १९९९ पासून महालक्ष्मी डेव्हलपर्सने ठिय्या मांडला आहे. न्यू हिंद मिलमधील अनुक्रमे १८७ सदनिका आर. आर. बिल्डर्स,वर्धमान यांच्या ताब्यात आहेत. रास डेव्हलपर्स (३२), डुमिर डेव्हलपर्स (४१), डी. जे. डेव्हलपर्स (४०), हरेकृष्णा चापसी बिल्डिंग (१३४), एम. बी. कन्स्ट्रक्शन (११७), अल्फा माना (६९), अलायन्स इन्फ्रा (५५) या विकासकांनी गेल्या तीन ते सात वर्षांपर्यंत संक्रमण सदनिका ताब्यात ठेवल्या आहेत.

म्हाडाच्या बहुतांश संक्रमण सदनिका विकासकांकडे असल्या तरी त्याचा तपशील म्हाडाकडे उपलब्ध नव्हता. आपण पाठपुरावा करून तो उपलब्ध करून घेतला. तेव्हा अनेक विकासकांकडे वर्षांनुवर्षे सदनिकांचा ताबा असल्याचे लक्षात आले. आता या सदनिका ताब्यात घेण्याची प्रक्रिया आम्ही लवकरच सुरू  करणार आहोत.

– विनोद घोसाळकर,  सभापती, मुंबई इमारत पुनर्रचना व दुरुस्ती मंडळ.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Three and a half thousand transition flats from mhada in the possession of developers abn