मुंबई : एका इसमाने बनावट भारतीय पारपत्राच्या (पासपोर्ट) आधारे इंग्लड आणि पोर्तुगीज या दोन देशांचे पारपत्र तसेच नागरिकत्व मिळवल्याचे उघड झाले आहे. मात्र ७ वर्षांनी मुंबई विमानतळावर त्याचे बिंग फुटले. त्याच्यावर सहार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी रात्री ८ च्या सुमारास लंडन येथून समीर ममोदिया (३७) नामक एक प्रवासी आला होता. इमिग्रेशन अधिकारी प्रसाद माघाडे यांना कागदपत्रांची तपासणी करत असता इमिग्रेशन विभागाच्या सिस्टीमवर तो लुकआऊट सेलवर असल्याचे आढळले. त्यामुळे त्याला पुढील चौकशीसाठी विंग इन्चार्ज दिनेश पिंगुलसर यांच्याकडे हजर करण्यात आले. त्याच्या पुढील चौकशीत त्याने केलेली तोतयागिरी उघडकीस आली.

त्या व्यक्तीचे खरे नाव समीर लखानी आहे. त्याच्याकडे भारतीय पारपत्र होते. त्याला २००८ मध्ये लंडनला जायचे होते. मात्र व्हिसा मिळाला नाही. त्यामुळे २०१५ मध्ये एका दलालामार्फत त्याने बनावट पारपत्र तयार केले. त्यासाठी आपले नाव बदलले आणि दिवदमण येथील नागरिक असल्याचे भासवून हे पारपत्र मिळवले. लंडनचा व्हिसा मिळविण्यासाठी त्याने आणखी एक शक्कल लढवली. पोर्तुगीज व्यक्तीचा मुलगा असल्याचे भासवून त्याने पोर्तुगाल देशाचे पारपत्र आणि नागरिकत्व घेतले. त्या पोर्तुगीज पारपत्राच्या आधारे तो लंडनला गेला. पोर्तुगीज पारपत्रावर दोन वेळा इंग्लंड ते भारत असा प्रवासही केला होता. नंतर त्याने पोर्तुगीज नागरिकत्व सोडले आणि ब्रिटनचे नागरिकत्व घेऊन ब्रिटीश पारपत्र मिळवले होते. ब्रिटनच्या पारपत्रावर लंडन वरून भारतात येताना मात्र पकडला गेला. समीर लखानी या आरोपीने बनावट भारतीय पारपत्राच्या आधारे इंग्लंड आणि पोर्तुगीज या दोन देशांचे पारपत्र तयार करताना कुणालाही संशय आला नव्हता. ७ वर्षात तीन पारपत्र, दोन देशांचे नागरिकत्व घेऊन त्याने ३ देशांची एकप्रकारे फसणवणूक केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय पारपत्र प्राधिकरण आणि भारतीय इमिग्रेशन विभागाची फसवणूक करून बनावट भारतीय पारपत्राच्या तयार करणे आणि त्याआधारे पोर्तुगीज आणि ब्रिटन देशाचे पारपत्र पारपत्र मिळवल्याची तक्रार इमिग्रेशन अधिकारी प्रसाद माघाडे यांनी सहार पोलीस ठाण्यात केली. याप्रकरणी त्याच्या विरोधात सहार पोलीस ठाण्यात पारपत्र अधिनियमाच्या कलम १२, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३३६ (२), ३३६ (३) आणि ३४०(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.