“काही दिवसांपूर्वी तीन जणांनी घराची रेकी केली” ; क्रांती रेडकरचा खळबळजनक दावा!

सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे सोपवणार असल्याचं देखील सांगितलं आहे.

(संग्रहीत छायाचित्र)

मागील काही दिवसांपासून राज्यात मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणावरून जोरदार गोंधळ सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी आज एक खळबळजनक दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी तीन जणांनी आमच्या घराची रेकी केली आहे आणि घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सर्व रेकॉर्ड झालं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

“काही दिवसांपूर्वी तीन जण आले होते व त्यांनी घराची रेकी केली आहे. त्यांचे सीसीटीव्ही फुटेज देखील आम्ही काढलं आहे आणि ते नक्कीच आम्ही पोलिसांसमोर मांडणार आहोत. ती लोक अतिशय भयानक आहेत, काय करतील काही सांगता येत नाही. माझ्या घरी माझी मुलं असतात, त्यांची सुरक्षा. कारण ती एवढी छोटी आहेत. घरी कर्मचारी असतात मी आणि समीर घरी नसलोच तर त्यांची जबाबदारी आणि सुरक्षा कोण पाहील. त्यामुळे आम्हाला नक्कीच वाटतं की याप्रकरणी काहीतरी केलं जावं.” असं क्रांती रेडकर एएनआयशी बोलताना म्हणाल्या आहेत.

तर, समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर आणि वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे हे केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांना भेटायला गेले होते.

“नवाब मलिक खोटे आरोप लावत आहेत कारण…”,रामदास आठवलेंनी घेतली समीर वानखेडेंची बाजू

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केलेले आरोप निराधार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले आहे. तसेच, “नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर सर्व प्रकारचे बिनबुडाचे आरोप केले आहेत. ते आमच्या समाजाची बदनामी करत आहेत. समीरच्या वडिलांचे नाव दाऊद नाही. मी त्यांची सर्व कागदपत्रेही पाहिली आहेत.” असंही आठवले यांनी सांगितले आहे.

“इथून पुढे मी….”, नवाब मलिकांच्या आरोपांनंतर अभिनेत्री क्रांती रेडकरची संतप्त प्रतिक्रिया!

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सातत्याने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर टीकासत्र सुरू ठेवलं आहे. कॉर्टेलिया क्रूजवर समीर वानखेडे यांनी टाकलेल्या छाप्यापासून थेट समीर वानखेडेंच्या धर्मापर्यंत अनेक बाबींवर नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Three men conducted recce of our housewill provide cctv to cops kranti redkar msr

ताज्या बातम्या