मुंबई : लालबाग परिसरातील चाळीमधील एका घरात एक तरुणी तिच्या आईच्या मृतदेहासोबत गेल्या तीन महिन्यांपासून राहत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मुलीला बुधवारी अटक केली. लालबाग येथील गॅस कंपनी लेन येथील इब्राहिम कासीम चाळीत वीणा जैन आणि त्यांची मुलगी रिंपल २००५ पासून राहत आहेत.
गेल्या तीन महिन्यांपासून भेट न झाल्याने वीणा यांचा भाऊ सुरेशकुमार पोरवाल याने बहीण बेपत्ता असल्याची तक्रार मंगळवारी काळाचौकी पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार पोलीस वीणा यांच्या घरी पोहोचले. त्या वेळी रिंपल हिने आई झोपली असल्याचे सांगून दरवाजा उघडण्यास नकार दिला. मात्र घरातून दरुगधी येत असल्याने पोलिसांनी घरात शोधमोहीम राबवली. त्या वेळी वीणा यांच्या मृतदेहाचे अवयव सापडले. पोलिसांनी मृतदेहाचे अवशेष ताब्यात घेऊन केईएम रुग्णालयात पाठवले आहेत.
याबाबत पोलिसांनी रिंपल हिच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली होती. वीणा यांच्या हत्येचे नेमके कारण अद्याप तिने सांगितले नाही. दरम्यान, रिंपल हिची मानसिक स्थिती ठीक नाही. त्यामुळे आईचा मृत्यू नेमका कधी झाला, कशी हत्या केली, याबाबत तिने कोणतीही माहिती दिली नाही. मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरण्यात आलेले इलेक्ट्रिक कटर, कोयता आणि सुरी पोलिसांनी हस्तगत केली आहेत.