मुंबई : सहा वर्षांपूर्वी नगरसेविकेला रात्री उशिरा पाठवलेल्या संदेशांमध्ये तिला ‘गुडिया’ असे संबोधल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेतील ४३ वर्षांच्या अधिकाऱ्याला सत्र न्यायालयाने दोषी ठरवून तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

वृत्तपत्रांतील जाहिरातील तोकडे कपडे घातलेल्या मॉडेलची छायाचित्रेही या अधिकाऱ्याने या नगरसेविकेला पाठवली होती. ही छायाचित्रे प्रसिद्ध झालेली असली तरी आरोपीला ती तक्रारदार महिलेला पाठवण्याचा अधिकार नसल्याचेही न्यायालयाने त्याला दोषी ठरवताना नमूद केले.

अश्लील ही संकल्पना व्यक्तीनुसार बदलते. तक्रारदार महिलेला पाठवलेल्या छायाचित्रांचा विचार केला तर भारतात अनेक कुटुंबात तोकडे कपडे घालणे अश्लीलता मानले जाते. या प्रकरणी तक्रारदार महिला आरोपीला ओळखत नसतानाही तिला अशा प्रकारची छायाचित्रे पाठवण्यात आल्याचेही न्यायालयाने म्हटले.

तक्रारदाराच्या नम्रतेचा अपमान करण्याच्या उद्देशाने तिला संदेश आणि छायाचित्रे पाठविल्याचे आणि कोणाच्याही गोपनीयतेला बाधा आणणारे कोणतेही संदेश पाठवण्याचा अधिकार कोणालाही नाही, असेही न्यायालयाने म्हटले.

आरोपीची चांगल्या वर्तनाच्या बंधपत्रावर सुटका करण्यासही न्यायालयाने नकार दिला. महिलांवरील गुन्हे वाढत आहेत. महिला घरात आणि घराबाहेरही सुरक्षित नाहीत. त्यामुळे आरोपीला शिक्षा हा अशाच प्रकारचा गुन्हा करणाऱ्या समाजासाठी धडा आहे. तसेच हा गुन्हा महिलांच्या विनयशीलतेशी संबंधित असल्याने आरोपीला चांगल्या वर्तनाच्या हमीवर जामिनावर बाहेर सोडता येणार नाही, असेही न्यायालयाने प्रामुख्याने स्पष्ट केले.

दरम्यान, आरोपीने त्याच्यावरील सगळ्या आरोपांचे खंडने केले. तक्रारदार महिलेशी झालेल्या भांडणामुळे तिने आपल्याविरोधात खोटी तक्रार दाखल केली. तसेच ती दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप आरोपीने केला.